Amitabh Bachchan’s emotional tribute to Vinod Khanna at Screen Awards : पुरस्कार सोहळ्यांमध्ये मनोरंजनविश्वातील अनेक जण एकत्र येत असतात आणि यानिमित्तानं त्यांच्यामध्ये गप्पा, गमती जमती, कामाबद्दलच्या चर्चा होत असतात. पुरस्कार म्हणजे कामाची पोचपावतीच असल्यानं अनेक जण त्यासाठी उत्सुक असतात. यावेळी कलाकार अनेकदा एकमेकांबद्दलच्या भावनासुद्धा व्यक्त करत असतात. एकदा ‘स्क्रीन अवॉर्डस्’मध्ये अमिताभ बच्चन यांनीसुद्धा दिवंगत अभिनेते विनोद खन्ना यांचं कौतुक केलेलं आणि त्यांच्या भावना व्यक्त केल्या होत्या.

२०१७मध्ये पार पडलेल्या ‘स्क्रीन अवॉर्डस्’मध्ये विनोद खन्ना यांना सर्व कलाकारांनी श्रद्धांजली वाहिली होती. त्यावेळी अमिताभ बच्चन यांनीसुद्धा त्यांच्या भावना व्यक्त केल्या होत्या. अमिताभ बच्चन यांनी त्यावेळी विनोद खन्ना कायम त्यांना हवं ते करायचे लोक काय म्हणतील हा विचार नाही करायचे असं म्हटलेलं. अभिनेते नेमकं काय म्हणाले होते सविस्तर जाणून घेऊयात…

अमिताभ बच्चन काय म्हणालेले?

‘इंडियन एक्सप्रेस’च्या वृत्तानुसार विनोद खन्ना यांच्या आठवणीत अमिताभ बच्चन म्हणालेले, “फिल्म इंडस्ट्रीत मी आलो तेव्हा तो माझ्या सुरुवातीच्या मित्रांपैकी एक होता. तो माझ्यापेक्षा ज्येष्ठ होता, पण कधीच मला तसं जाणवू दिलं नाही. आम्ही एकत्र अनेक चित्रपट केले. विनोद खन्ना नेहमी स्वतःच्या मनाने वागायचा, लोक काय म्हणतात याची त्याला पर्वा नव्हती. तो खूप सकारात्मक आणि वेगळं आयुष्य जगला. त्याला एक यशस्वी नायक म्हणून प्रेक्षकांनी स्वीकारलेलं. खूप प्रसिद्धी आणि यश मिळाल्यानंतर त्याने राजकारणात प्रवेश केला. एखाद्या अभिनेत्यासाठी हे खूप दुर्मीळ आहे.”

Award Banner

पुढे ते म्हणालेले, “अभिनय क्षेत्रात अशा प्रकारचं यश फार कमी लोकांना मिळतं. विनोद आपल्याला खूप लवकर सोडून गेला, आणि आजही आम्हाला त्याची खूप आठवण येते”. विनोद खन्ना आणि अमिताभ बच्चन दोघेही यशाच्या शिखरावर असताना त्यांची नेहमी तुलना व्हायची. दोघांमध्ये स्पर्धा आहे अशा बातम्याही वारंवार यायच्या. काहीजण तर असंही म्हणायचे की अमिताभ यांच्या वाढत्या प्रसिद्धीचा विनोद यांना हेवा वाटतो. पण विनोद खन्ना यांनी एका मुलाखतीत यावर स्पष्ट मत व्यक्त केलं होतं.

अमिताभ बच्चन यांच्याबरोबर होणाऱ्या तुलनेबद्दल विनोद खन्ना काय म्हणालेले?

अमिताभ बच्चन यांच्याबरोबर होणाऱ्या तुलनेबद्दल विनोद खन्ना म्हणालेले, “तो (अमिताभ) सगळ्यांचं लक्ष वेधून घेतो, पण मला त्याचं काही वाईट वाटत नाही. मला माझं योग्य ते यश मिळालं आहे असं मला वाटतं. माझ्याशिवाय ते चित्रपट बनूच शकले नसते. अमिताभसमोर स्पर्धा देणारा मीच एक होतो, दुसरा कोणी नव्हता. मग मी स्वतःला कमी का समजावं? मीडिया नेहमी ही स्पर्धा जिवंत ठेवते. हे सगळं मीडियाचंच काम आहे. जर १०० लोकांना विचारलं तर ५० जण अमिताभच्या बाजूने बोलतील, तर बाकीचे विनोद खन्नाच्या बाजूने बोलतील.”