Amitabh Bachchan Struggling Days : अमिताभ बच्चन हे बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेते आहेत. ९०च्या काळात विविध हिंदी सिनेमांमध्ये काम करत त्यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. त्यांची क्रेझ आजही कायम आहे. परंतु, संघर्ष कलाकाराला चुकत नाही, त्यामुळे तुमचे कितीही लाखो करोडो चाहते असले तरी पैशांचं सोंग आणता येत नाही असं म्हटलं जातं. असंच काहीसं अमिताभ यांच्याबरोबरही झालेलं.
अमिताभ बच्चन १९८०-९०च्या काळात संघर्ष करत होते. या दरम्यान त्यांनी राजकारणासाठी अभिनयातून ब्रेक घेतला होता. परंतु, त्यांना बोफोर्स घोटाळ्यासंदर्भात निर्माण झालेल्या वादामुळे राजीनामा द्यावा लागला होता. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये अभिनेते अंजन श्रीवास्तव ज्यांनी बँकर म्हणून काम करत असताना अमिताभ बच्चन यांना लोन मिळवून दिलं होतं; त्यांनी अमिताभ बच्चन आर्थिकदृष्ट्या संघर्ष करत असतानाचा प्रसंग सांगितला आहे. अंजन श्रीवास्तव व अमिताभ बच्चन यांनी ‘खुदा गवाह’, ‘शहेनशहा’, ‘अग्निपथ’ यांसारख्या चित्रपटांत एकत्र काम केलं आहे. तर सध्या अंजन हे ‘वागले की दुनिया’ या लोकप्रिय मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहेत.”
अंजन श्रीवास्तव यांनी सांगितलं की, अमिताभ बच्चन यांनी बँकेला त्यांचे सर्व पैसे परत करणार असं वचन दिलं होतं आणि जेव्हा बँकेकडून लोनसाठी जया बच्चन यांची साक्ष मागण्यात आली तेव्हा अंजन यांनीच त्यांना लोन मिळवून देण्यात मदत केली. ‘फ्रायडे टॉकीज’शी संवाद साधताना अंजन म्हणाले, बँकेचे चेअरमनना अमिताभ यांना भेटायचं होतं, कारण अभिनेते बँकेची ब्रँच बदलण्याच्या विचारात होते. तेव्हा अमिताभ यांनी बँकेच्या चेअरमनला त्यांच्या घरी आमंत्रित केलं. त्याकाळी अमिताभ बोफोर्सच्या वादात अडकले होते. बँकेला पैसे परत हवे होते आणि तेव्हा अंजन यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली होती.
अंजन श्रीवास्तव पुढे सांगतात, “बँक अमिताभ यांच्याकडून पैसे मागत असताना मी त्या मॅनेजरला अमिताभ यांच्या कमालिस्तानच्या स्टुडिओमध्ये घेऊन गेलो, तेव्हा अमिताभ म्हणाले होते की मी तुमचा एक एक पैसा परत करेन आणि त्यांनी ते केलंसुद्धा. अमिताभ बच्चन दिलेला शब्द पाळणारे आहेत.” पुढे अंजन म्हणाले, “बँकेने जया यांनी साक्षीदार म्हणून राहावं असं सांगितलं होतं आणि त्यासुद्धा लोनसाठी अमिताभ यांच्याकडून साक्षीदार झाल्या.”
‘राजश्री अनप्ल्ग’शी संवाद साधताना मागे अंजन यांनी असंही सांगितलं होतं की, १९९०च्या दरम्यान अमिताभ बच्चन आर्थिकदृष्ट्या संघर्ष करत होते. ते म्हणाले, “मला असं वाटलं की त्यांच्या एबीसीएल या कंपनीत काम करणाऱ्यांनी त्यांची फसवणूक केली. बँकेने मला त्यांच्याविरोधात खटला दाखल करण्यास सांगितला होता, परंतु जेव्हा आम्ही त्यांना भेटलो, तेव्हा अमिताभ हात जोडून सांगत होते की मी शक्य तितक्या लवकर तुमचे सगळे पैसे परत करणार आहे. तेव्हा मी म्हटलं की आम्हाला माहीत आहे, आमचा विश्वास आहे; पण अशा परिस्थितीत दुसऱ्या कुठल्याही बँकेशी असे व्यवहार करू नका आणि मी बँकेत जाऊन त्यांच्या विरुद्ध खटला दाखल करू नये याकरिता विनंती केली.”
अंजन पुढे म्हणाले, “अमिताभ बच्चन आर्थिकदृष्ट्या संकटात सापडले होते. त्यांच्या एबीसीएल या कंपनीमुळे हे झालं होतं. आम्ही त्यांच्या ऑफिसमध्ये जायचो, तेव्हा लोक त्यांना खूप काही बोलत असत. पण, त्यांचं नशीब बदललं ते २००० सालादरम्यान आणि त्यानंतर त्यांनी सगळ्या देणेकऱ्यांचे पैसे परत केले.”