Know about Amitabh Bachchan First Girlfriend: अमिताभ बच्चन काही दिवसांपासून त्यांच्या ब्लॉग पोस्टमुळे चर्चेत आहेत. ते पहाटे ४ पर्यंत काम करतात आणि त्यानंतर ते झोपतात. तसेच, ते त्यांच्या ब्लॉग पोस्टमध्ये त्यांना आलेला अनुभव सांगतात. तसेच, त्यांच्या चित्रपटांचे किस्सेही सांगतात. याबरोबरच अमिताभ बच्चन त्यांच्या खासगी आयुष्यामुळेही चर्चेत असतात.

आजही त्यांच्या रिलेशनशिपची चर्चा होताना दिसते. आजही जया बच्चन, रेखा व बिग बींच्या लव्ह ट्रँगलबद्दल बोलले जाते. त्यांच्या नात्याबद्दल जाणून घेण्यास प्रेक्षक उत्सुक असतात. मात्र, अमिताभ बच्चन यांची पहिली गर्लफ्रेंड कोण होती, याबद्दल तुम्हाला माहीत आहे का?

हनिफ झवेरी यांनी एका मुलाखतीत नुकताच याबद्दल खुलासा केला होता. अमिताभ बच्चन यांची पहिली गर्लफ्रेंड होती, याबद्दल जाणून घेऊ…

अमिताभ बच्चन यांची पहिली गर्लफ्रेंड होती ‘ही’ मुलगी

प्रसिद्ध लेखक हनिफ झवेरी यांनी नुकतीच ‘मेरी सहेली’ या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. या मुलाखतीत हनिफ झवेरी यांनी बिग बींचे पहिले प्रेम कोण होते, याचा खुलासा केला. हनिफ झवेरी म्हणालेले, “त्यावेळी अमिताभ बच्चन यांनी अभिनय क्षेत्रात पाऊलही ठेवलं नव्हतं. ते कोलकातामध्ये काम करीत होते. त्यावेळी ते एका मुलीबरोबर रिलेशनशिपमध्ये होते. तेव्हा ते एका कंपनीत काम करायचे. ब्रिटिश एअरवेज, असं या कंपनीचं नाव होतं. त्यावेळी त्यांना २५०-३०० रुपये मिळायचे. तेव्हा त्यांच्या आयुष्यात माया नावाची एक मुलगी आली. त्या दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम होतं. ते एकमेकांना भेटायचे.”

ते पुढे म्हणालेले, “अमिताभ बच्चन कालातरांने त्यांचं अभिनयाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुंबईत आले. त्यानंतर त्या दोघांनाही कठीण परिस्थितीचा सामना करावा लागला. जेव्हा ते मुंबईत आले तेव्हा ते त्यांच्या आई तेजा बच्चन यांच्या जवळच्या मित्राच्या घरी वास्तव्यास होते. तिथे त्यांना माया भेटण्यासाठी येत असे. अमिताभ बच्चन यांना भीती वाटली की, त्यांच्या आईला मायाबद्दल माहीत होईल. त्यामुळे त्यांनी ते घर सोडले. त्यावेळी ते अन्वर अली यांच्या सात हिंदुस्तानी या चित्रपटात काम करीत होते. त्यांनी त्यांच्या राहण्याची समस्या अन्वर अली यांना सांगितली. अन्वर अली यांनी मेहबूब अली यांच्या घरात त्यांना राहण्यासाठी जागा दिली. माया व अमिताभ बच्चन यांचे नातं चांगलं होतं; मात्र ते टिकू शकलं नाही. अमिताभ बच्चन त्यावेळी खूप लाजाळू होते; तर माया खूप बोल्ड होती. त्यांच्या दोघांच्या व्यक्तिमत्त्वात खूप फरक होता. अन्वर अली यांनी अमिताभ बच्चन यांना वेगळे होण्याचा सल्ला दिला. त्यांच्या मतानुसार, त्या दोघांच्या व्यक्तिमत्त्वात खूप फरक असून, बच्चन कुटुंबात माया राहू शकणार नाही. अमिताभ बच्चन यांना जेव्हा त्यांच्यात व मायामध्ये खूप फरक असल्याचं जाणवलं तेव्हा त्यांनी मायापासून हळूहळू दूर राहण्यास सुरुवात केली. कालातरांने दोघांनी हे नातं संपवलं.”

दरम्यान, रेखा व अमिताभ बच्चन यांच्या नात्याबद्दलही अनेकदा बोलले जाते. जया बच्चन व अमिताभ बच्चन यांनी ३ जून १९७३ रोजी लग्नगाठ बांधली. आजही रेखा, जया बच्चन व अमिताभ बच्चन यांच्या प्रेमी त्रिकोणाबद्दल चर्चा रंगताना दिसतात. अमिताभ बच्चन यांच्या कामाबद्दल बोलायचे, तर ते लवकरच ‘कल्की २’मध्ये दिसणार आहेत.