Amitabh Bachchan gets emotional: अमिताभ बच्चन यांचा फक्त भारतातच नाही तर संपूर्ण जगभरात मोठा चाहतावर्ग आहे. अमिताभ बच्चन ८३ व्या वर्षीसुद्धा विविध सिनेमांतून प्रेक्षकांचे मनोरंजन करतात. तसेच, ‘कौन बनेगा करोडपती’ या शोचे ते वर्षानुवर्षे सूत्रसंचालन करत आहेत. या शोमध्ये ते स्पर्धकांबरोबर संवाद साधतात. त्यांच्या आयुष्याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. नवीन पिढीशी संवाद साधतात. याबरोबरच ते त्यांच्या करिअरमधील अनेक किस्से सांगतात, त्यांच्या सहकलाकारांच्या आठवणी सांगतात, काही वेळा ते त्यांच्या खासगी आयुष्यातील काही खास गोष्टी सांगतात.

अमिताभ बच्चन हे दर रविवारी त्यांच्या चाहत्यांना भेटतात. देशाच्या कानाकोपऱ्यातून चाहते अमिताभ बच्चन यांची एक झलक पाहण्यासाठी येतात. अमिताभ बच्चनही त्यांच्या बंगल्याबाहेर त्यांच्या चाहत्यांना भेटतात. काही वेळा चाहत्यांसाठी खास भेटवस्तूही आणतात. या सगळ्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

मुंबईच्या मुसळधार पावसातही भेटीला आले चाहते

नुकतेच अमिताभ बच्चन यांच्या मुंबईतील जलसा बंगल्याबाहेरील काही व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. बिग बींच्या घरासमोर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचे या व्हिडीओमध्ये पाहायला मिळाले. मुंबईत सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. तरीही रविवारी मोठ्या संख्येने चाहते अमिताभ बच्चन यांना भेटण्यासाठी आले होते, याचाही व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळाला होता.

आता अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये चाहत्यांच्या भेटीबद्दल लिहिले आहे. तसेच, त्यांनी कृतज्ञताही व्यक्त केली आहे. त्यांनी लिहिले, “ते हात हलवून अभिवादन करतात, हात जोडून नमस्कार करतात, ऑटोग्राफ देतात आणि मग ते निघून जातात. त्यांच्याबद्दल माझ्या मनात कायमच आदर आहे.”

पुढे त्यांनी असेही लिहिले, “पाऊस असो, ऊन असो किंवा थंडी, चाहते प्रत्येक वेळी त्याच उत्साहाने भेटायला येतात. त्यांचे हे प्रेम आणि समर्पण मनाला स्पर्शून जाते.” ब्लॉगच्या शेवटी त्यांनी सर्वांना काळजी घेण्याचे आवाहनही केले.

अमिताभ बच्चन ब्लॉगच्या माध्यमातून कायमच विविध विषयांवर व्यक्त होत असतात. त्यांची मते, त्यांच्या भावना, आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टी याबद्दल व्यक्त होत असतात.

दरम्यान, अमिताभ बच्चन लवकरच ‘कल्की २८९८ एडी २’ या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांच्या लूकचे फोटो पाहायला मिळाले होते.