दिवंगत अभिनेते धर्मेंद्र यांच्या करिअरमधील सर्वात गाजलेल्या भूमिकांपैकी एक म्हणजे त्यांनी साकारलेला ‘शोले’तील विरू. ‘शोले’मध्ये अमिताभ बच्चन हेमा मालिनी, जया बच्चन, संजीव कुमार, अमजद खान अशा दिग्गज कलाकारांची मांदियाळी होती. ५० वर्षांपूर्वी आलेल्या या चित्रपटासाठी अमिताभ बच्चन यांची वर्णी धर्मेंद्र यांच्यामुळे लागली होती. धर्मेंद्र यांनी स्वतः याबद्दल सांगितलं होतं.

‘शोले’ चित्रपटात जय ही भूमिका अमिताभ बच्चन आणि विरूची भूमिका धर्मेंद्र यांनी केली होती. ‘ये दोस्ती हम नही तोडेंगे’ हे दोघांवर चित्रीत करण्यात आलेलं गाणंही खूप गाजलं होतं. या दोघांच्या जोडीला प्रेक्षकांचं खूप प्रेम मिळालं होतं. १९७५ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचं अमिताभ बच्चन यांच्या करिअरमध्ये मोलाचं योगदान आहे. कारण धर्मेंद्र त्यावेळी सुपरस्टार होते आणि त्यांच्याच शिफारशीवरून, अमिताभ बच्चन यांना शोलेमध्ये जयची भूमिका ऑफर करण्यात आली होती.

एएनआयशी बोलताना धर्मेंद्र म्हणालेले, “हो, मी त्यांचे (अमिताभ बच्चन) नाव सुचवले होते. मी असं म्हणत नाही की मी त्याला ही भूमिका द्यायला लावली. अमिताभ साहेब मला भेटायला यायचे. ते माझ्या शेजारी बसायचे. म्हणून मी एकदा रमेश सिप्पीजींना सांगितलं की हा एक नवीन मुलगा आहे, त्याचा आवाज चांगला आहे. आवाजावरून तो उत्तम काम करेल, असं वाटतंय. मला त्यांची अभिनयाची आवड, स्वतःवरील प्रेम या गोष्टी चांगल्या वाटल्या होत्या. त्यामुळे मी त्यांना अमिताभ यांना सिनेमात घेण्यास सांगितलं.”

‘शोले’मधील जयची भूमिका सुरुवातीला शत्रुघ्न सिन्हा यांना ऑफर करण्यात आली होती. पण धर्मेंद्र यांच्या शिफारसीमुळे अमिताभ यांना ही भूमिका मिळाली, असं म्हटलं जातं.

amitabh bachchan got sholay because of dharmendra(1)
शोलेच्या सेटवरील कलाकारांचा फोटो (सौजन्य इंडियन एक्सप्रेस)

धर्मेंद्र यांची प्रकृती बिघडल्यावर स्वतः गाडी चालवत बिग बी धर्मेंद्र यांच्या घरी गेले होते. धर्मेंद्र यांचं सोमवारी, २४ नोव्हेंबर रोजी निधन झालं. लाडक्या मित्राला अखेरचा निरोप द्यायला अमिताभ बच्चनही आले होते. त्यांचा नातू अगस्त्य नंदाही त्यांच्याबरोबर होता. रात्री अडीच वाजता अमिताभ बच्चन यांनी भावुक पोस्ट करत धर्मेंद्र यांच्याबद्दल भावना व्यक्त केल्या.