Amitabh Bachchan Reveals His Struggle With Insomnia : बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन त्यांच्या ब्लॉगमधून अनेकदा वैयक्तिक अनुभव, आयुष्यातील शिकवण आणि त्यांचे विचार चाहत्यांबरोबर शेअर करत असतात. नुकत्याच केलेल्या एका पोस्टमध्ये त्यांनी कामाच्या व्यापामुळे झोप न लागण्याच्या समस्येबद्दल सांगितलं. अशा वेळी मन शांत करण्यासाठी ते काय करतात, हेही त्यांनी उघड केलं.

रात्री वेळेत झोप येत नाही आणि मग सकाळी उठल्यानंतर झोप अपूर्ण असल्याने दिवसभर तनाव, थकवा जाणवतो अशा समस्या अनेकांना असतात, अनेक जण यावर वेगवेगळे उपाय करत असतात. बिग बी अमिताभ बच्चनसुद्धा याला अपवाद ठरलेले नाही. उलट कलाकार मंडळींचं वेळापत्रक नियमीत नसून त्यांच्या शूटिंगमुळे झोपेचं वेळापत्रक अनेकदा विसकळीत होतं आणि याचा परिणाम कधी कधी प्रकृतीवर, मानसिक आरोग्यावर होतो. अशातच आता अमिताभ बच्चन यांनी ते अशावेळी काय करतात याबद्दल सांगितलं आहे.

मंगळवारी पहाटे ४:१४ वाजता अमिताभ बच्चन यांनी आपल्या ब्लॉगवर पोस्ट करत कामामुळे रात्रभर जागं राहावं लागत असल्याबद्दल मनमोकळेपणाने सांगितलं. आपल्या दिनचर्येबद्दल बोलताना त्यांनी मान्य केलं की डॉक्टरांनी पुरेशी झोप घेण्याचा सल्ला दिला असला, तरी अनेकदा कामालाच प्राधान्य द्यावं लागतं.

अमिताभ बच्चन यांना आहे झोपेची समस्या

अमिताभ बच्चन यांनी आपल्या ब्लॉगमध्ये लिहिलं, “रात्रभर काम केल्यामुळे पहाटेपर्यंत झोपच येत नाही. कारण झोपेपेक्षा काम अधिक महत्त्वाचं आहे. वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात की हे योग्य नाही. किमान सात तासांची झोप आवश्यक असते. शरीराची वाढ, विकास आणि दुरुस्ती ही झोपेतच होत असते, पण मग करायचं तरी काय? काम करत असताना मी माझ्या ब्लॉगमध्ये गुंतलेलो असतो.”

रात्री शांतपणे झोपण्यासाठी अमिताभ बच्चन काय करतात?

अमिताभ बच्चन यांनी पुढे संगीताशी असलेल्या आपल्या भावनिक नात्याबद्दल सांगितलं. अस्वस्थ रात्रींमध्ये संगीतामुळे मनाला शांतता मिळते, असं त्यांनी म्हटलं. ते म्हणाले, “संगीत हे आत्म्याला परमेश्वराशी जोडणारा एक दुवा आहे. तो एक अदृश्य धागा आहे, जो दिसत नसला तरी त्याची जाणीव कायम होत राहते. मला असं वाटतं की हे संगीत मनाच्या आतल्या तारांना स्पर्श करतं. ते लावून शांतपणे ऐकलं, तर मनाला शांत झोप मिळते. जगाच्या कोणत्याही भागातलं संगीत असो, त्यामध्ये असलेले सात सूर हे संपूर्ण मानवजातीला जोडणारे समान धागे आहेत. संगीताचा आदर करा, तेही तुमचा आदर करेल.”

अमिताभ बच्चन आता लवकरच ‘कल्की’च्या सीक्वलमध्ये दिसणार आहेत. या चित्रपटात ते पुन्हा एकदा अश्वत्थामा ही भूमिका साकारणार आहेत. अलीकडेच त्यांनी सेटवरील कमल हासन यांच्याबरोबरचे काही फोटो शेअर करत पुन्हा एकत्र काम करत असल्याचा आनंद व्यक्त केला.

दिग्दर्शक नाग अश्विन यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेला या चित्रपटाचा पहिला भाग २०२४ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने जगभरात १,००० कोटी रुपयांहून अधिक कमाई करत मोठं यश मिळवलं होतं. चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेता प्रभास आणि दीपिका पादुकोण मुख्य भूमिकेत होते. सीक्वलमध्ये प्रभास पुन्हा दिसणार असला, तरी दीपिका पदुकोण या प्रोजेक्टचा भाग नसल्याचं सांगितलं जात आहे.

याशिवाय अमिताभ बच्चन यांचा ‘सेक्शन 84’ हा कोर्टरूम ड्रामा चित्रपटही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन रिभू दासगुप्ता यांनी केले आहे. चित्रपटात डायना पेंटी, निम्रत कौर आणि अभिषेक बॅनर्जी हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपटाचं शूटिंग पूर्ण झालं असून, अद्याप रिलीज डेट जाहीर करण्यात आलेली नाही.