अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळातील संघर्ष सांगितला. काम मिळवताना त्यांना त्यांच उंची आणि चेहऱ्याची ठेवण हे हिरोच्या भूमिकेसाठी अडथळे मानले जात असल्याचं निर्मात्यांनी त्यांना सांगितलं होतं.
अमिताभ बच्चन यांना निर्मात्यांनी सुनावलेलं
‘कौन बनेगा करोडपती १८’च्या नुकत्याच झालेल्या भागात एका स्पर्धकाने अमिताभ बच्चन यांच्या आयकॉनिक हेअरस्टाइलबद्दल विचारलं. यावेळी अमिताभ यांनी त्यांच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळातील एक किस्सा सांगितला. ते म्हणाले, “सर काय आहे की सुरुवातीला जेव्हा मी चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी आलो होतो तेव्हा निर्माते मला दोन गोष्टींबद्दल बोलायचे. एक माझी उंची खूप आहे त्यामुळे कोणतीही अभिनेत्री काम करणार नाही आणि दुसरी की माझा चेहरा खूप छोटा आहे असं सांगायचे.” त्यांच्या लूकबद्दल व्यक्त करण्यात आलेल्या चिंतेमुळे अखेर अमिताभ बच्चन यांनी केसांवर वेगवेगळे प्रयोग करायला सुरुवात केली. पुढे त्यांचा सर्वाधिक ओळखला जाणारा लूक ठरलेली ही हेअरस्टाइल सुरुवातीला चेहरा थोडा भरलेला दिसावा यासाठी केली होती.
अमिताभ बच्चन यांनी सांगितली हेअरस्टाइलमागची खरी गोष्ट
ते आठवून अमिताभ म्हणाले, “तर काय आहे, चेहरा भरलेला दिसावा यासाठी आम्ही केस वाढवले आणि ते कानपट्टीपर्यंत आणले, जेणेकरून माझा चेहरा भरलेला दिसेल.” पुढे ही हेअरस्टाइल १९७०च्या दशकातील अमिताभ बच्चन यांच्या लूकची ओळख बनली. याच काळात त्यांचा हिंदी चित्रपटसृष्टीतील मोठ्या कलाकारांपैकी एक होण्याचा प्रवास सुरू झाला.
अमिताभ बच्चन यांनी १९६९ मध्ये ‘सात हिंदुस्तानी’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. या चित्रपटात त्यांनी कवी अन्वर अली यांची भूमिका साकारली होती. यानंतर त्यांनी ‘रेश्मा और शेरा’, ‘परवाना’, ‘संजोग’ आणि ‘बंसी बिरजू’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं. यापैकी अनेक चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर म्हणावं तसं यश मिळालं नाही.
१९७१ मध्ये आलेल्या ‘आनंद’ आणि १९७२ मधील ‘बॉम्बे टू गोवा’ या चित्रपटांमधील त्यांच्या अभिनयामुळे अमिताभ बच्चन यांना अधिक ओळख मिळाली. मात्र, त्यांच्या कारकिर्दीला कलाटणी देणारा महत्त्वाचा टप्पा त्याच्या एका वर्षानंतर आला. १९७३ मध्ये अमिताभ बच्चन यांनी ‘जंजीर’ चित्रपटात पोलीस अधिकारी विजय खन्नाची भूमिका साकारली. हा चित्रपट त्यांच्या कारकिर्दीतील मोठा ब्रेक ठरला. तसेच यामुळे त्यांना ‘अँग्री यंग मॅन’ म्हणून ओळख मिळाली, जी पुढे त्यांच्या कारकिर्दीचा महत्त्वाचा भाग ठरली.यानंतर त्यांनी ‘दीवार’, ‘शोले’, ‘अमर अकबर अँथनी’, ‘डॉन’, ‘मुकद्दर का सिकंदर’ आणि ‘त्रिशूल’ यांसारख्या अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केलं.
