Amitabh Bachchan KBC 18 Jaya Bachchan Secrets: बॉलीवूडचे बिग बी अमिताभ बच्चन हे सध्या ‘कौन बनेगा करोडपती’च्या १८व्या पर्वाचं सूत्रसंचालन करत आहेत. या कार्यक्रमादरम्यान ते अनेकदा स्पर्धकांशी मनमोकळ्या गप्पा मारतात आणि आयुष्यातील अनुभव शेअर करत असतात. नुकताच अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या घरातील एक किस्सा सांगितला आहे. जया बच्चन यांना झोपायला पाठवून ते व अभिषेक बच्चन रात्री उशिरापर्यंत टीव्ही बघत असल्याचा खुलासा अमिताभ बच्चन यांनी केला आहे.

एका एपिसोडमध्ये अमिताभ बच्चन यांना KBC मधील एका स्पर्धकाने रात्री उशिरापर्यंत मॅच बघताना जया बच्चन विरोध करतात का, याबद्दल विचारले. त्यावर बिग बी यांनी त्यांच्या घरामध्येही हीच परिस्थिती असल्याचे सांगितले. अमिताभ यांच्यासह अभिषेक बच्चनलाही उशिरापर्यंत मॅच बघण्याची आवड आहे. म्हणून त्यांनी घरामध्येच एक युक्ती वापरल्याचा भन्नाट किस्सा अमिताभ बच्चन यांनी सांगितला आहे.

जया झोपायला गेल्यावर आम्ही रात्रभर मॅच बघतो – अमिताभ बच्चन

रात्री उशिरापर्यंत मॅच बघण्याबाबत प्रश्नावर अमिताभ बच्चन म्हणाले, “हो.. माझ्या घरातही अगदी हेच होते. त्यावर उपाय म्हणून मी एक युक्ती शोधून काढली आहे. मी माझ्यासाठी वेगळा टीव्ही लावून घेतला आहे आणि मी जयाला सांगत असतो, ‘झोपायला जा… फार उशीर झाला आहे. आता तुम्ही जाऊन झोपा’ जया झोपायला गेल्यावर आम्ही रात्रभर मॅच बघत असतो.”

पण जया बच्चन यांना टीव्हीच्या आवाजाचा त्रास होऊ नये, याची ते आवर्जून काळजी घेत असल्याचे अमिताभ यांनी सांगितले. ते म्हणाले, “टीव्हीचा आवाज खाली जाऊ नये म्हणून कधी कधी मी हेडफोन लावून मॅच बघतो; तर कधी कधी टीव्हीचा आवाज अगदी कमी ठेवतो. पण, जर मॅचमध्ये आवडती टीम जिंकली की मात्र हा सगळा प्लॅन फसतो.”

अमिताभ म्हणाले, “पण जर मॅचमध्ये माझी किंवा अभिषेकची आवडती टीम जिंकली, तर आम्ही जोरजोरात आनंद साजरा करतो. आम्ही रात्रीच्या वेळी असं मोठ्याने ओरडलो, तर घरातील सर्व जण घाबरून उठतात आणि ‘काय झालं? काही गडबड झालीये का?’ असं विचारतात. त्यावर अमिताभ आणि अभिषेक यांना समजावून सांगावं लागतं, “आमच्या टीमचा गोल झाला आहे किंवा आमच्या टीमने षटकार मारला आहे.”