Amitabh Bachchan KBC 18 Bollywood Rejection Struggle : बॉलीवूडचे बिग बी अमिताभ बच्चन यांनी अनेक दशकं प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. अमिताभ बच्चन यांनी एक काळ गाजवला असून आजही ते सिनेविश्वामध्ये सक्रिय आहेत. ८३ वर्षीय अमिताभ बच्चन सध्या ‘कौन बनेगा करोडपती’चे सूत्रसंचालन करत आहेत. त्यांना अनेक वर्षे सिनेविश्वामध्ये काम करण्याचा अनुभव असला तरी सुरुवातीच्या काळामध्ये त्यांना अनेकदा नकार मिळाल्याचा खुलासा स्वतः अमिताभ बच्चन यांनी केला आहे.

KBCच्या नव्या एपिसोडमध्ये कॉमनवेल्थ गेम्स २०२६ सुवर्णपदक विजेत्या लोव्हलिना बोरगोहेन, झंडू कुमार, शर्मिला धनकर आणि अस्मिता डे हे खेळाडू सहभागी झाले. यावेळी अमिताभ बच्चन यांना अस्मिता डे यांनी कधी शूटिंगवेळी दिग्दर्शकांचा ओरडा मिळाला आहे का, याबाबत प्रश्न विचारला. यावर बिग बी यांनी करिअरच्या सुरुवातीच्या काळामध्ये अनेकदा त्यांना उंचीवरून बोलल्याच्या आणि अभिनयावरून ओरडल्याच्या आठवणी सांगितल्या आहेत.

अमिताभ बच्चन यांना सुरुवातीला अभिनयावरुन बसला होता ओरडा

अमिताभ बच्चन म्हणाले, “आम्हालासुद्धा ओरडा बसत असतो. चित्रपट करायला सुरुवात केली, तेव्हा सुरुवातीच्या काळामध्ये खूप ओरडा खाल्ला आहे. सुरुवातीला काहीजण म्हणायचे, ‘तुला तर काहीच अॅक्टिंग वगैरे येत नाही…तुझी उंची तर खूप जास्त आहे, घरी जा…’ असं बोललं जात होतं.”

पुढे बिग बी म्हणाले, “जेव्हा अखेर मला काम करण्याची संधी मिळाली, तेव्हा मला सांगण्यात आलं होतं, ‘ठीक आहे, जा जाऊन तिकडे उभा राहा आणि डायलॉग बोल,’ यावर मी डायलॉग म्हटल्यानंतर मला विचारायचे, “अशा प्रकारे डायलॉग बोलले जातात का? असं कोण बोलतं? ते मला ओरडायचे, पण त्यातून हळूहळू मी माझ्यामध्ये सुधारणा करत गेलो.”

एकदा अमिताभ बच्चन यांना सेटवर पोहचण्यासाठी उशीर झाल्याने त्यांना दिग्दर्शकांनी थेट घरी पाठवल्याचा किस्सा त्यांनी सांगितला. ते म्हणाले, “सहसा मी शूटिंगला वेळेवर पोहोचण्याचा प्रयत्न करतो, मात्र एकदा मला उशीर झाला होता. दिग्दर्शक सेटच्या बाहेर उभे होते. त्यावेळी माझ्याकडे स्वतःची गाडी नव्हती, त्यामुळे मी दुसऱ्याच्या गाडीतून सेटवर पोहोचलो. मी येताच दिग्दर्शकांनी मला पाहिलं आणि म्हणाले, ‘शूटिंगचं पॅकअप झालंय, तू आता इथून निघून जा.”

दरम्यान, ‘कौन बनेगा करोडपती’चा १८ वा सीझन सुरू झाला आहे. रोज रात्री ९ वाजता सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजन आणि सोनी लिव्हवर एपिसोड प्रसारित केले जातात. या नवीन पर्वाची ‘सोचना पड़ेगा’ ही थीम आहे.