Amitabh Bachchan KBC Ujjwal Nikam Kasab Secret : अमिताभ बच्चन सूत्रसंचालन करीत असलेल्या ‘कौन बनेगा करोडपती’च्या नव्या भागामध्ये सरकारी वकील व खासदार उज्ज्वल निकम सहभागी झाले आहेत. त्याचबरोबर अभिनेता राजकुमार राव व वामिका गब्बी हेही KBC मध्ये आले होते. त्यांच्या प्रहार : द अनटोल्ड स्टोरी ऑफ उज्ज्वल निकम या सिनेमाच्या प्रमोशनसाठी ते आले असून, यावेळी उज्ज्वल निकम यांनी मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या खटल्याबद्दलची माहिती दिली. तसेच अजमल कसाबने बिग बी अमिताभ बच्चन यांच्या नावाचा उल्लेख केल्याचे सांगितले.

अजमल कसाबने केलेला अमिताभ बच्चन यांचा उल्लेख

२६/११ च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यांचा खटला व अजमल कसाबबरोबरी संभाषण, तसेच या काळातील कठीण प्रसंग सांगितले. कसाबला अटक केल्यानंतर त्याने सुरुवातीला मुंबईत कधी आणि का आलो, याची खोटी माहिती दिल्याचे उज्ज्वल निकम यांनी सांगितले. कसाबने २६/११ च्या हल्ल्यावेळी नाही, तर ६ नोव्हेंबर रोजी अटक झाल्याचा दावा केला होता. तसेच, बॉलीवूड फिल्म इंडस्ट्रीचा चाहता असल्याने आणि अमिताभ बच्चन यांचे घर पाहण्यासाठी मुंबईत आल्याचे कसाबने सांगितले होते. तसेच त्याला ‘रॉ’ने अटक केल्याचाही दावा कसाबने केल्याचे उज्ज्वल निकम यांनी सांगितले.

अजमल कसाबबद्दल काय म्हणाले उज्ज्वल निकम?

पुढे उज्ज्वल निकम म्हणाले, “कसाबने तो अल्पवयीन असल्याचे सांगत, त्याच्यावर बाल न्याय कायदा लागू करण्याची मागणी केली. त्याचे योग्य वय ठरविण्यासाठी त्याच्या हाडांची तपासणी आणि अनेक वैद्यकीय चाचण्या केल्या होत्या. तसेच त्याने न्यायालयामध्ये विष दिले जात असल्याचा दावा केला होता. मात्र, त्याने ज्या पदार्थाचा उल्लेख केला होता, ते फक्त तांदळाचे पीठ होते. कसाबचा दावा खोटा असल्याचे सिद्ध करण्यासाठी तेसुद्धा तपासणीसाठी पाठवले होते.”

या केससंदर्भात पुढे निकम यांनी सांगितले की, कनिष्ठ न्यायालयाने कसाबला फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर ते मुंबई उच्च न्यायालयात हजर झाले होते. त्या वेळी कसाबला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. सुनावणीदरम्यान कसाब कॅमेऱ्यावर थुंकला होता, अशी माहितीही निकम यांनी दिली. मात्र, खटल्याच्या शेवटच्या टप्प्यात कसाबला पश्चात्ताप होत असल्याची भावना दिसून आली होती. कसाबमध्ये निर्माण झालेला हा पश्चात्तापच त्याच्यासाठी सर्वांत मोठी शिक्षा होती, असे मत उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केले.