‘कल्कि 2898 एडी’ या बहुप्रतिक्षित चित्रपटातून ‘अश्वत्थामा’चा पहिला लूक समोर आला आहे. या चित्रपटातील लूक पोस्टर व एक टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. यामध्ये ‘अश्वत्थामा’च्या भूमिकेत महानायक अमिताभ बच्चन यांचा दमदार लूक पाहायला मिळत आहे. या चित्रपटातील लूक पोस्टर बिग बींनी स्वतः शेअर केलं, त्यानंतर टीझर रिलीज करण्यात आला.

या वर्षीचा सर्वात मोठा चित्रपट ‘कल्कि 2898 एडी’ ची गेल्या काही दिवसांपासून खूप चर्चा होत आहे. एकापाठोपाठ एक कलाकारांचे फर्स्ट लूक समोर येत असून आता या चित्रपटात अमिताभ बच्चन यांचा लूक कसा असेल हेही समोर आले आहे. खुद्द अमिताभ बच्चन यांनी फोटो शेअर केला आहे.

यामी गौतमच्या ‘आर्टिकल ३७०’ चित्रपटाबद्दल शरद पोंक्षेंची प्रतिक्रिया; म्हणाले, “काँग्रेसने काय वाटोळं…”

या चित्रपटाच्या टीझरमध्ये अमिताभ बच्चन व एका लहान मुलांचे संवाद ऐकू येतात. व्हिडीओत अमिताभ बच्चन यांचे संपूर्ण शरीर पांढऱ्या कपड्याने झाकलेले असून फक्त त्यांचे डोळे दिसतात. ते शिवलिंगाची पूजा करत असताना तेवढ्यात एक मुलगा त्यांच्याकडे येतो आणि म्हणतो, ‘हाय…मी राया आहे.’ यानंतर तो अश्वथामाला बरेच प्रश्न विचारतो. मग अश्वत्थामाच्या कपाळातून रक्त येतं आणि मुलगा म्हणतो, ‘तू देव आहेस?’ यावर ते म्हणतात, ‘आता वेळ आली आहे, माझ्या शेवटच्या युद्धाची वेळ आली आहे.’ यानंतर ते अश्वत्थामाची ओळख सांगतात. यामध्ये लहान मुलगा तेलुगूमध्ये बोलताना दिसतो, तर अमिताभ बच्चन हिंदीत बोलतात. या टीझरची सध्या जोरदार चर्चा होत आहे.

या चित्रपटात प्रभास आणि दीपिका पदुकोण मुख्य भूमिकेत दिसणार आहेत, तर अमिताभ बच्चन यांची खास भूमिका आहे. हा चित्रपट एक मेगाबजेट चित्रपट आहे जो या वर्षी मे महिन्यात प्रदर्शित होणार आहे. नाग अश्विन यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.