Jaya Bachchan on Amitabh Bachchan: अमिताभ बच्चन व जया बच्चन हे बॉलीवूडमधील लोकप्रिय जोडपे आहे. आजही ते विविध भूमिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येतात. अमिताभ बच्चन अभिनयाबरोबरच ‘कौन बनेगा करोडपती’ या शोचे सूत्रसंचालनदेखील करतात. याबरोबरच, अमिताभ बच्चन हे त्यांच्या ब्लॉगमधूनही प्रेक्षकांच्या संपर्कात असतात. ब्लॉगमध्ये ते अनेक किस्से, त्यांच्या मनातील भावना, त्यांना आलेले अनुभव सांगतात. काहीवेळा त्यांच्या जुन्या मुलाखतीतील वक्तव्ये व्हायरल होत असतात.

अमिताभ बच्चन व जया बच्चन यांनी बरखा दत्तला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत त्यांनी त्यांच्या लग्नाबद्दल, त्यांच्या नात्याबद्दल वक्तव्य केले होते. ते काय म्हणाले होते हे जाणून घेऊ…

“माझे व अमिताभ बच्चन यांचे व्यक्तिमत्त्व…”

जया बच्चन म्हणालेल्या, “माझे व अमिताभ बच्चन यांचे व्यक्तिमत्त्व, स्वभाव अगदी विरुद्ध आहे. जेव्हा मत मांडण्याची वेळ येते, तेव्हा अमिताभ बच्चन तितक्या मोकळेपणाने सांगत नाहीत, ते खुलेपणाने बोलत नाहीत, माझ्याप्रमाणे ते त्यांची मते मांडत नाहीत, ते गोष्टी त्यांच्यापुरत्या मर्यादित ठेवतात; पण त्यांना माहीत आहे की गोष्टी योग्य वेळी योग्य पद्धतीने त्यांना हव्या तशा कशा करून घ्यायच्या, तसं माझं नाही. त्यांचे व्यक्तिमत्त्व वेगळे आहे.” पुढे हसत त्या म्हणालेल्या, “कदाचित त्यामुळेच मी त्यांच्याशी लग्न केले असेन.”

जया बच्चन यांनी या मुलाखतीत असेही कबूल केले होते की पाहता क्षणी त्या अमिताभ यांच्या प्रेमात पडल्या होत्या. तसेच बिग बींची जी शिस्त आहे ती त्यांना आवडते, असेही त्या म्हणाल्या होत्या.

अभिनेत्री गमतीने असेही म्हणाल्या, “मी अमिताभ बच्चन यांना लग्नाबाबत त्यांचे मत काय आहे असे कधीही विचारले नाही. कदाचित ते असेही म्हणतील की ही त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक आहे, पण मला ते ऐकायचे नाही.”

राजकारणातील प्रवेशाबद्दल जया बच्चन काय म्हणालेल्या?

राजकारणातील प्रवेशाबद्दल, त्यासाठी कुटुंबाचा पाठिंबा होता का त्याबद्दलही त्यांनी वक्तव्य केले होते. अमिताभ बच्चन जेव्हा राजकारणात उतरले होते, त्याबद्दल जया बच्चन म्हणालेल्या, “मी जेव्हा राजकारणात जाण्याचा निर्णय घेतला, तेव्हा माझे कुटुंब फारसे आनंदी नव्हते. मी चुकीचे होते म्हणून नाही, तर मी उघडपणे बोलेन असे त्यांना वाटले. जेव्हा अमिताभ संसदेत होते तेव्हा ते निराश झाले असतील. त्यांची मते मांडण्यासाठी तो योग्य मंच आहे असे त्यांना वाटले नसेल. पण, मला फरक पडत नाही. मी एका पत्रकाराची मुलगी आहे, मी माझी मते स्पष्टपणे मांडते.”

त्या असेही म्हणाल्या होत्या, “जेव्हा अमिताभ बच्चन राजकारणात होते, त्यावेळी मी त्यांना पाठिंबा दिला. घरोघरी जाऊन प्रचार केला. त्यावेळी असे कोणीही करत नव्हते. मला असे वाटायचे की, तुम्ही जे कोणी आहात ते तुम्हाला देशाने घडवले आहे आणि तुम्ही देशवासीयांचे कोणत्या ना कोणत्या प्रकारे देणे लागता.”

इंदिरा गांधींच्या हत्येनंतर १९८४ ला अमिताभ बच्चन यांनी राजकारणात प्रवेश केला होता. राजीव गांधी व अमिताभ बच्चन जवळचे मित्र होते. अलाहाबादची निवडणूक अमिताभ बच्चन यांनी लढवावी, असे राजीव गांधींनी सुचवले. ही निवडणूक अमिताभ बच्चन विक्रमी फरकाने जिंकले, पण १९८७ ला ते राजकारणातून बाहेर पडले. त्यानंतर राजकारणात जाण्याचा निर्णय भावनिकतेतून घेतला होता असे त्यांनी म्हटले. तसेच, ती चूक असल्याचेदेखील ते म्हणाले.