ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना बुधवारी, १२ नोव्हेंबरला ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. बॉबी देओलने वडिलांना घेऊन जुहू येथील घरी आणलं. आता धर्मेंद्र यांच्यावर घरीच उपचार सुरू आहेत. धर्मेंद्र यांना घरी आणल्यावर बरेच जण त्यांच्या भेटीसाठी जात आहेत. आता महानायक अमिताभ बच्चन यांनी धर्मेंद्र यांची भेट घेतली.
धर्मेंद्र रुग्णालयात असताना सलमान खान, शाहरुख खान, आमिर खान व गौरी, आर्यन खान, अमीषा पटेल, गोविंदा यांनी त्यांची भेट घेतली होती. तसेच देओल कुटुंबीय सातत्याने त्यांच्याबरोबर होते. आता अमिताभ बच्चन लाडक्या मित्राच्या भेटीसाठी त्यांच्या घरी जातानाचा व्हिडीओ समोर आला आहे.
‘शोले’तील जय म्हणजेच अमिताभ बच्चन मित्र विरू अर्थात धर्मेंद्र यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी त्यांच्या जुहू येथील घरी गेले. ८३ वर्षांचे अमिताभ स्वतः गाडी चालवत धर्मेंद्र यांच्या भेटीसाठी गेले. त्यांचा व्हिडीओ इंस्टन्ट बॉलीवूडने शेअर केला आहे.
पाहा व्हिडीओ-
अमिताभ बच्चन यांच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव केला आहे. ‘याला म्हणतात खरी मैत्री,’ ‘या वयातही अमिताभ बच्चन स्वतः गाडी चालवत मित्राच्या भेटीसाठी गेले,’ ‘जय विरू’ अशा कमेंट्स या व्हिडीओवर पाहायला मिळत आहेत.

दरम्यान, धर्मेंद्र यांना ३१ ऑक्टोबर रोजी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांना वाढत्या वयानुसार काही समस्या आहेत, त्यामुळे उपचार सुरू होते. पण दोन दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती बिघडली तसेच निधनाच्या अफवा पसरल्या होत्या. त्यानंतर मुलांनी त्यांना रुग्णालयातून घरी आणलं. घरीच त्यांच्यावर उपचार सुरू राहणार आहेत. ब्रीच कँडी रुग्णालयाचे डॉक्टर वेळोवेळी धर्मेंद्र यांची तपासणी करत आहेत. धर्मेंद्र यांची प्रकृती स्थिर असून ते उपचारांना प्रतिसाद देत आहेत, ते बरे होत आहेत, असं सनी देओलच्या मॅनेजरने सांगितलं.
धर्मेंद्र व अमिताभ बच्चन दोघेही या वयातही इंडस्ट्रीत सक्रिय आहेत. बिग बी कौन बनेगा करोडपती होस्ट करतात, तसेच चित्रपटही करतात. तर धर्मेंद्र लवकरच श्रीराम राघवनच्या ‘इक्कीस’ चित्रपटामध्ये झळकणार आहेत. या चित्रपटात अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा मुख्य भूमिकेत आहे. त्याचबरोबर सिमर भाटिया बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या चित्रपटात जयदीप अहलावत, सिकंदर खेर, विवान शाह, राहुल देव, आर्यन पुष्कर, प्रगती आनंद यांच्याही भूमिका आहेत.
