Jaya Bachchan on Amitabh Bachchan: अमिताभ बच्चन यांचा ‘जंजीर’ हा चित्रपट चांगलाच गाजला. १९७३ ला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात अमिताभ बच्चन आणि जया बच्चन या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसले होते.

जर चित्रपट गाजला तर दोघांना लंडनला ट्रीपला पाठवण्यात येईल, असे निर्मात्यांनी त्यांना वचन दिले होते, त्यामुळे ब्लॉकबस्टर ठरल्यानंतर अमिताभ बच्चन आणि जया बच्चन लंडनला एका महिन्यासाठी सुट्टीला जाणार होते.

मात्र, लग्नाशिवाय दोघेच लंडनला जाणे अमिताभ बच्चन यांच्या पालकांना अमान्य होते, त्यामुळे त्यांनी जवळच्या लोकांच्या उपस्थितीत लग्नगाठ बांधली. ३ जून १९७३ ला जया आणि अमिताभ लग्नबंधनात अडकले. आजही हे बॉलीवूडचे लोकप्रिय जोडपे कोणत्या ना कोणत्या कारणाने सातत्याने चर्चेत असते.

Award Banner

आता जया बच्चन यांनी नुकतीच मोजो स्टोरीला मुलाखत दिली. बरखा दत्त यांच्याशी बोलताना जया बच्चन यांनी अमिताभ बच्चन आणि त्यांच्या स्वभावात खूप फरक असल्याचे सांगितले. त्या गमतीत असेही म्हणाल्या, “मी जर माझ्यासारखाच स्वभाव असलेल्या व्यक्तीशी लग्न केले असते, तर तो वृदांवनमध्ये आणि मी दुसरीकडे कुठेतरी असते.”

“खुलेपणाने बोलत नाहीत”

अमिताभ बच्चन आणि त्यांच्या स्वभावात असलेल्या फरकाबद्दल त्या म्हणाल्या, “ते खुलेपणाने बोलत नाहीत, माझ्याप्रमाणे ते त्यांची मते मांडत नाहीत, ते गोष्टी त्यांच्यापुरत्या मर्यादित ठेवतात; पण त्यांना माहीत आहे की गोष्टी योग्य वेळी योग्य पद्धतीने त्यांना हव्या तशा कशा करून घ्यायच्या, तसं माझं नाही. त्यांचे व्यक्तिमत्त्व वेगळे आहे.” पुढे हसत त्या म्हणाल्या, “कदाचित त्यामुळेच मी त्यांच्याशी लग्न केले असेन.”

जया बच्चन यांनी या मुलाखतीत असेही कबूल केले की पाहता क्षणी त्या अमिताभ यांच्या प्रेमात पडल्या होत्या. तसेच बिग बींची जी शिस्त आहे ती त्यांना आवडते, असेही त्या म्हणाल्या.

अभिनेत्री गमतीने असेही म्हणाल्या, “मी अमिताभ बच्चन यांना लग्नाबाबत त्यांचे मत काय आहे असे कधीही विचारले नाही. कदाचित ते असेही म्हणतील की ही त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक आहे, पण मला ते ऐकायचे नाही.”

जया बच्चन म्हणाल्या, “संसदेत खूप आरडाओरडा, गोंधळ असतो त्यामुळे मला कमी ऐकू येते. देवाचे उपकार आहेत की मी वेडी झाले नाही, फक्त मला कमी ऐकू येते.”

“…तेव्हा माझे कुटुंब फारसे आनंदी नव्हते”

राजकारणातील प्रवेशाबद्दल, त्यासाठी कुटुंबाचा पाठिंबा होता का त्याबद्दल आणि अमिताभ बच्चन जेव्हा राजकारणात उतरले होते, त्याबद्दल जया बच्चन म्हणाल्या, “मी जेव्हा राजकारणात जाण्याचा निर्णय घेतला, तेव्हा माझे कुटुंब फारसे आनंदी नव्हते. मी चुकीचे होते म्हणून नाही, तर मी उघडपणे बोलेन असे त्यांना वाटले. जेव्हा अमिताभ संसदेत होते तेव्हा ते निराश झाले असतील. त्यांची मते मांडण्यासाठी तो योग्य मंच आहे असे त्यांना वाटले नसेल. पण, मला फरक पडत नाही. मी एका पत्रकाराची मुलगी आहे, मी माझी मते स्पष्टपणे मांडते.”

“जेव्हा अमिताभ बच्चन राजकारणात होते, त्यावेळी मी त्यांना पाठिंबा दिला. घरोघरी जाऊन प्रचार केला. त्यावेळी असे कोणीही करत नव्हते. मला असे वाटायचे की तुम्ही जे कोणी आहात, ते तुम्हाला देशाने घडवले आहे आणि तुम्ही देशवासियांचे कोणत्या ना कोणत्या प्रकारे देणे लागता.

इंदिरा गांधींच्या हत्येनंतर १९८४ ला अमिताभ बच्चन राजकारणात उतरले होते. राजीव गांधी व अमिताभ बच्चन जवळचे मित्र होते. अलाहाबादची निवडणूक अमिताभ बच्चन यांनी लढवावी, असे राजीव गांधींनी सुचवले. ही निवडणूक अमिताभ बच्चन विक्रमी फरकाने जिंकले. पण, १९८७ ला ते बाहेर पडले. त्यानंतर राजकारणात जाण्याचा निर्णय भावनिकतेतून घेतला होता असे त्यांनी म्हटले. तसेच, ती चूक असल्याचेदेखील ते म्हणाले.