अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्या लग्नाला ५२ वर्षे झाली आहेत. मात्र, आजही या जोडीच्या नात्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहत्यांमध्ये उत्सुकता असते. दोघांनी एकत्र अनेक चित्रपटांमध्ये काम केलं असून, रुपेरी पडद्यावरही त्यांची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. नुकतंच अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या रोजच्या आयुष्याशी संबंधित एक मजेशीर खुलासा केला. जया बच्चन यांच्यासाठी त्यांनी आजवर एक कप चहादेखील बनवला नसल्याचं बिग बींनी सांगितलं आहे.
‘कौन बनेगा करोड़पती १८’च्या एका भागात पद्मिनी नावाच्या स्पर्धकाने अमिताभ बच्चन यांना विचारलं की, त्यांनी कधी पत्नी जया बच्चन यांच्यासाठी चहा बनवला आहे का? या प्रश्नाचं उत्तर देताना अमिताभ यांनी आजवर जया यांच्यासाठी कधीही चहा बनवला नसल्याचं सांगितलं. यामागचं कारणही त्यांनी सांगितलं. ते स्वतः चहा पीत नाहीत आणि त्यांना चहा बनवताही येत नाही, असं बिग बींनी म्हटलं.
मला चहा बनवता येत नाही – अमिताभ बच्चन
अमिताभ बच्चन म्हणाले, “देवीजी, पाहा, जो माणूस चहा पीत नाही, तो चहा कसा बनवणार? आम्ही अनेकदा पाहिलं आहे की जयाजी फारसा चहा पीत नाहीत. पितात, पण किती पितात, हे आम्हाला माहीत नाही आणि त्या जो काही चहा पितात, तो मी बनवून देत नाही. मला चहा बनवता येत नाही”.
बिग बींनी पुढे सांगितलं, “आजकाल चहा बनवण्यासाठी एक पिशवी (टी-बॅग) येते, जिला धागा लावलेला असतो. ती गरम पाण्यात टाकली की चहा तयार होतो. पण मी त्याचाही कधी वापर केलेला नाही. आता मी खरा चहा बनवायला शिकत आहे, जेणेकरून कधी जयाजींना चहा पिण्याची इच्छा झाली, तर मी त्यांच्यासाठी चहा बनवू शकेन”. अमिताभ बच्चन यांनी ‘केबीसी १८’दरम्यान केलेल्या या मजेशीर खुलाशातून त्यांच्या आणि जया बच्चन यांच्या वैयक्तिक आयुष्याची एक रंजक झलक पाहायला मिळते.
अशी सुरू झाली अमिताभ बच्चन-जया बच्चन यांची प्रेमकहाणी
अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्या प्रेमकहाणीबद्दल बोलायचं झालं तर, त्या काळात जया या प्रसिद्ध अभिनेत्री होत्या, तर अमिताभ बच्चन बॉलीवूडमध्ये आपलं स्थान निर्माण करण्यासाठी संघर्ष करत होते. दोघांची झालेली ओळख हळूहळू मैत्रीत बदलली आणि पुढे या मैत्रीचं प्रेमात रूपांतर झालं. अमिताभ यांचा शांत स्वभाव आणि त्यांचं व्यक्तिमत्त्व जया यांना खूप भावलं होतं. दोघांनी ‘गुड्डी’, ‘एक नजर’, ‘जंजीर’, ‘अभिमान’, ‘चुपके चुपके’ आणि ‘शोले’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं.
