अमिताभ बच्चन यांनी मुलगा अभिषेक बच्चनबरोबरच्या नात्याबद्दल भाष्य केलं आहे. मतं वेगवेगळी असणं म्हणजे दोन व्यक्तींची दिशा वेगळी असतेच असं नाही, असं त्यांनी म्हटलं. नुकत्याच केलेल्या ब्लॉगपोस्टमध्ये त्यांनी तरुण पिढीच्या मतांचा आणि त्यांच्या निवडींचा आदर करण्याचं महत्त्वही अधोरेखित केलं.
वडील-मुलाच्या नात्याबद्दल लिहिताना अमिताभ बच्चन म्हणाले की, पालक आणि मुलांची एखाद्या गोष्टीकडे पाहण्याची पद्धत वेगळी असू शकते, मात्र त्यांचं ध्येय एकच असू शकतं. त्यांनी आपल्या ब्लॉगमध्ये लिहिलं, “पिता-पुत्र दोघे एकाच मार्गावर असले, आमचे विचार वेगळे असले तरी, ध्येय एकच आहे.” याचा अर्थ “वडील आणि मुलगा एकाच मंचावर बसले आहेत; दोघांचे विचार वेगवेगळे असले तरी त्यांचं ध्येय एकच आहे.” असा होतो.
अमिताभ बच्चन यांचा तरुणांना सल्ला
यानंतर अमिताभ बच्चन यांनी पुढच्या पिढीला स्वतःची मतं बनवण्याचं आणि स्वतःच्या निवडी करण्याचं स्वातंत्र्य देण्याचं महत्त्व अधोरेखित केलं. त्यांनी म्हटलं की, समजूतदारपणा, आदर आणि प्रेमाच्या माध्यमातून नात्यांमध्ये समान धागा शोधता येतो. त्यांनी पुढे लिहिलं, “पुढच्या पिढीचा नेहमी आदर करा… पण ध्येय नेहमी एकच असतं… घेतलेल्या प्रत्येक मार्गाचा तोच आदर्श असावा… आणि नातंही नेहमी असंच राहिलं आहे शोध घ्या, जाणून घ्या, समजून घ्या आणि सर्वांसाठी समान असणारं, प्रेम आणि आदराने परिपूर्ण असं ध्येय निश्चित करा.”
अमिताभ बच्चन आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून नियमितपणे त्यांचे वैयक्तिक अनुभव, काम आणि आयुष्याबद्दलचे विचार चाहत्यांबरोबर शेअर करत असतात.दरम्यान, सध्या ते केबीसी सीझन १८च्या सूत्रसंचालनात व्यग्र आहेत. यामार्फतही ते त्यांच्या आयुष्यातील अनेक किस्से, घटना सांगत असतात.
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटांबद्दल बोलायचं झालं तर अमिताभ बच्चन शेवटचे टी. जे. ज्ञानवेल दिग्दर्शित ‘वेट्टैयन’ या चित्रपटात रजनीकांत यांच्याबरोबर दिसले होते. आता ते ‘कल्की 2898 एडी’च्या सिक्वेलमध्ये अश्वत्थामाच्या भूमिकेत पुन्हा दिसणार आहेत. नाग अश्विन दिग्दर्शित या चित्रपटात प्रभास आणि कमल हासन यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.
