Amitabh Bachchan on Abhishek Bachchan: अमिताभ बच्चन ‘कौन बनेगा करोडपती’च्या मंचावर अमिताभ बच्चन अनेक गोष्टी शेअर करतात. स्पर्धकांशी बोलताना, त्यांचे किस्से ऐकताना बिग बीसुद्धा त्यांचे किस्से, आठवणी आणि त्यांच्या आयुष्यातील अनेक गोष्टी सांगतात. अनेकदा त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील खुलासे करतात. कुटुंबातील व्यक्तींच्या खास, माहीत नसलेल्या गोष्टी सांगतात. तसेच, जया बच्चन, अभिषेक बच्चन, श्वेता बच्चन, आराध्या, नव्या, अगस्त्य नंदा या सगळ्यांबद्दल अमिताभ बच्चन काही ना काही सांगत असतात.
कुटुंबातील सदस्यांच्या सवयी ते त्यांना कोणत्या गोष्टी आवडतात, कोणत्या आवडत नाही अशा अनेक गोष्टींबद्दल अमिताभ बच्चन खुलासा करत असतात. आता नुकतेच त्यांनी ‘कौन बनेगा करोडपती’च्या मंचावर अभिषेकच्या खाण्याच्या सवयीबद्दल खुलासा केला आहे. त्याला काय खायला आवडत नाही, याबद्दल सांगितले आहे.
“मी त्याला माझा मित्र…”
‘कौन बनेगा करोडपती’मध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकाशी बोलताना अमिताभ बच्चन यांनी अभिषेक बच्चनशी कसे नाते आहे, याबद्दल सांगितले. तसेच, त्याच्या खाण्याच्या सवयीबद्दल त्यांनी वक्तव्य केले. ते म्हणाले, “मी त्याला माझा मित्र मानतो.”
पुढे ते म्हणाले, “त्याची विचित्र सवय आहे. तो फळं खात नाही. ही खूप वेगळी गोष्ट आहे. कारण- आम्ही सगळेच फळं वगैरे खात असतो. जर दुधाचा कुठला पदार्थ असेल, तर तो खाण्याआधी तो थोडा विचार करतो; पण फळं तर तो खातच नाही.”
पुढे अमिताभ बच्चन यांनी त्यांचे वडील हरिवंशराय बच्चन यांनी लिहिलेल्या कवितेच्या दोन ओळी सांगितल्या. हरिवंशराय बच्चन यांनी त्यांच्या कवितेतून बाप-मुलाच्या नात्याबद्दल सांगितले होते. त्या ओळींचा अर्थ असा की, माझी मुलं फक्त माझी मुलं आहेत म्हणून माझे उत्तराधिकारी होणार नाहीत; तर जे माझे उत्तराधिकारी होतील, ती माझी मुलं असतील. (मेरे बेटे, बेटे होने से उत्तराधिकारी नहीं होंगे, जो मेरे उत्तराधिकारी होंगे वो मेरे बेटे होंगे)
अभिषेक बच्चनबद्दल बोलायचे, तर तो आई-वडिलांप्रमाणेच अभिनय क्षेत्रात काम करीत आहे. गेली २५ वर्षे तो विविध भूमिकांतून प्रेक्षकांचे मनोरंजन करीत आहे. जमीन, गुरू अशा अनेक सिनेमांतून अभिषेक बच्चनने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्याच्या भूमिकांचे वेळोवेळी कौतुक होताना दिसते. लवकरच, तो द किंग या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
दरम्यान, अभिषेकच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे, तर त्याने ऐश्वर्या रायबरोबर लग्नगाठ बांधली आणि त्यांना आराध्या ही मुलगी आहे.
