Amitabh Bachchan once spoke about divorce: अमिताभ बच्चन, जया बच्चन व रेखा हे असे त्रिकूट आहे, ज्यांच्या नात्याची चर्चा वर्षानुवर्षे होत आहे. आज अमिताभ बच्चन ८३ वर्षांचे आहेत, जया बच्चन ७८ वर्षांच्या आहेत तर रेखा ७१ वर्षांच्या आहेत. मात्र, आजही अमिताभ बच्चन व रेखा यांच्या रिलेशनशिपबद्दल, जया व अमिताभ बच्चन यांच्या नात्याबद्दल वेळोवेळी चर्चा होताना दिसते. तसेच त्यांचे जुने किस्से, त्यांनी केलेली वक्तव्ये याबद्दल बोलले जाते.

जया व अमिताभ बच्चन, रेखा यांच्या वैयक्तिक आयुष्याचे पडसाद १९८१ ला प्रदर्शित झालेल्या सिलसिला या सिनेमात दिसले आहेत, असे म्हटले जाते. या तीनही कलाकारांनी स्पष्टपणे त्यांच्या नात्याबद्दल कधीही वक्तव्य केले नाही. मात्र, यासर उस्मान यांनी त्यांच्या ‘रेखा: द अनटोल्ड स्टोरी’ या पुस्तकात या तीन कलाकारांबद्दल अनेक गोष्टी लिहिल्या आहेत.

“जर ते माझ्या पाठीमागे काही करत असतील तर…”

या पुस्तकात त्यांनी या कलाकारांशी बोलून त्यांची मतेही नोंदवली आहेत. अमिताभ बच्चन यांचे कोणाशी रिलेशनशिप आहे का, यावर जया बच्चन यांनी वक्तव्य केले होते. त्या म्हणालेल्या, “जगाला जे म्हणायचे आहे ते त्यांना म्हणू द्या. पण, त्यांनी (अमिताभ बच्चन) मला वचन दिले आहे आणि जर ते इतर कोणाच्या प्रेमात असतील, ते सांगण्याचे त्यांच्याकडे धाडस आहे. जर ते माझ्या पाठीमागे काही करत असतील तर ती त्यांची समस्या आहे, माझी नाही.

या पुस्तकात रेखा यांच्याशी संबंधितही एक किस्सा गाजला होता. जया बच्चन यांनी रेखा यांना घरी बोलावले होते. त्यावेळी काय घडले होते, याबद्दलही या पुस्तकात लिहिले आहे. पुस्तकात लिहिल्याप्रमाणे, रेखा या अमिताभ बच्चन यांचे क्षणिक आकर्षण आहेत, असे जोपर्यंत जया यांना वाटत होते, तोपर्यंत त्यांना काहीच अडचण नव्हती. पण, ज्यावेळी गोष्टी पुढे जाऊ लागल्या आहेत, भावनिक गुंतागुंत वाढलेली दिसली, त्यावेळी जया दुखावल्या गेल्या. त्यांनी रेखा यांना घरी जेवणासाठी आमंत्रित केले आणि रेखा परत निघण्यापूर्वी जया यांनी निर्धाराने सांगितले की काहीही होऊ दे, मी अमितला कधीही सोडणार नाही. रेखा यांनीही हा किस्सा एका मुलाखतीत सांगितला होता.

रेखा, अमिताभ व जया यांच्या नात्याबद्दल मोठ्या प्रमाणात चर्चा होत होत्या. त्यावेळी अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या लग्नाबद्दल एक विधान केले होते. त्याचीही नोंद रेखा द अनटोल्ड स्टोरी या पुस्तकात आहे. अमिताभ बच्चन म्हणालेले, “आम्ही कधीच घटस्फोट घेणार नाही. मी भारतीय आहे, त्यामुळे माझा घटस्फोटावर विश्वास नाही. जया यांना पत्नीच्या रूपात स्वीकारणे ही माझी सर्वोत्तम निवड होती.”

जया व अमिताभ बच्चन, रेखा हे तीनही कलाकार बॉलीवूडमधील लोकप्रिय कलाकार आहेत. त्यांचे बॉलीवूडला उंचीवर नेण्यात महत्त्वाचे योगदान आहे. अमिताभ बच्चन आजही विविध भूमिकांतून प्रेक्षकांच्या भेटीला येतात, तर जया बच्चन व रेखा क्वचित प्रसंगी मनोरंजन करताना दिसतात.