अमिताभ बच्चन यांनी नुकतंच ‘कौन बनेगा करोडपती’ १८च्या मंचावर आपल्या विद्यार्थी जीवनातील आठवणींना उजाळा दिला. यावेळी त्यांनी शैक्षणिक जीवनातील संघर्ष आणि सिनेसृष्टीत येण्यापूर्वी विचार केलेल्या करिअरच्या पर्यायाबद्दल सांगितलं आहे.

‘कौन बनेगा करोडपती’१८मध्ये सहभागी झालेल्या स्पर्धक प्रगती कालपेकर यांच्याशी संवाद साधताना अमिताभ बच्चन यांनी एकेकाळी भारतीय परराष्ट्र सेवेत (IFS) अधिकारी होण्याचा विचार केला होता, असा खुलासा केला. प्रगती यांनी बक्षिसाची रक्कम पुढील शिक्षणासाठी वापरून IFS अधिकारी होण्याचं ध्येय असल्याचं सांगितल्यानंतर दोघांमध्ये ही चर्चा रंगली.

अमिताभ बच्चन यांना जायचं होतं भारतीय परराष्ट्र सेवेत

अमिताभ बच्चन यांनीही सांगितलं की, एकेकाळी त्यांच्या मनातही IFS अधिकारी होण्याचा विचार आला होता. ते म्हणाले, “असे अनेक स्पर्धक येतात, जे सांगतात की त्यांना UPSCची परीक्षा द्यायची आहे. परराष्ट्र सेवा हे खूप चांगलं क्षेत्र आहे. एकेकाळी माझ्या मनातही IFS अधिकारी होण्याचा विचार आला होता. पण मला आयएफएस मधील ‘आय’सुद्धा माहिती नव्हता. त्यामुळे मी हार मानली आणि तो विचार सोडून दिला.” अमिताभ बच्चन यांनी सांगितलं की, परराष्ट्र सेवेत जाण्याची कल्पना त्यांना आकर्षक वाटत होती, मात्र या क्षेत्राबद्दल त्यांना फारशी माहिती नव्हती. त्यामुळे अखेर त्यांनी IFS अधिकारी होण्याचा विचार सोडून दिला.

अभिनेते अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या पदवीच्या शिक्षणाच्या काळाबद्दलही मनमोकळेपणाने सांगितलं आणि शैक्षणिक जीवन त्यांच्यासाठी नेहमीच सोप नव्हतं, अशी कबुली दिली. त्यांचे वडील हरिवंश राय बच्चन शिक्षणाला खूप महत्त्व देत असल्याचं सांगत अमिताभ यांनी आपल्या कुटुंबात पदवीचं शिक्षण अत्यंत महत्त्वाचं मानलं जात असल्याचं म्हटलं. त्यांनी विज्ञानाची निवड केली होती, मात्र हा विषय किती कठीण आहे, याची त्यांना लवकरच जाणीव झाली. हा किस्सा सांगताना ते म्हणाले, “मी सायन्स घेतलं होतं आणि पहिल्याच लेक्चरमध्ये शाळेत १० वर्षांत जे काही शिकलो होतो, ते सगळं शिकवून झालं. तेव्हा वाटलं की हा विषय घेऊन आपण चूक केली.”

अमिताभ बच्चन परिक्षेत झालेले नापास

अमिताभ बच्चन यांनी पुढे एका परीक्षेत नापास झाल्याचाही मजेशीर खुलासा केला. मात्र त्यानंतर त्यांनी ती परीक्षा दिली आणि अखेर उत्तीर्ण केली. ते म्हणाले, “परीक्षेत नापास झालो. मग ATKTमध्ये दोन गुणांनी पास झालो. हे कोणाला सांगू नका.” ‘कौन बनेगा करोडपती’च्या मंचावर स्पर्धकांशी संवाद साधताना अमिताभ अनेकदा त्यांच्या आयुष्यातील, चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वीच्या आठवणी आणि वैयक्तिक किस्से शेअर करताना दिसतात. या संवादातूनही त्यांची अशीच मनमोकळी बाजू प्रेक्षकांना पाहायला मिळाली. एकेकाळी नागरी सेवेत जाण्याचा विचार करणारे अमिताभ बच्चन अखेर चित्रपटसृष्टीत आले आणि भारतीय सिनेमातील दिग्गज अभिनेत्यांपैकी एक म्हणून नाव कमावलं.