Amitabh Bachchan : बॉलीवूडमध्ये अनेक कलाकारांनी विविध भूमिकांमधून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. काही कलाकार मात्र विशिष्ट व्यक्तिरेखांमुळे कायमचे ओळखले जातात. ज्येष्ठ अभिनेते आलोक नाथ यांनीही स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. पडद्यावर प्रेमळ आणि सुसंस्कृत वडिलांच्या भूमिकांमुळे त्यांना ‘बाबूजी’ अशी ओळख मिळाली. मात्र, अनेकांना कदाचित माहीत नसेल की, आलोक नाथ यांनी तब्बल १४ वर्षांनी मोठे असलेल्या ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या वडिलांची भूमिका केली होती.
आलोक नाथ यांनी अनेक दशके सिनेविश्वामध्ये भूमिका साकारल्या असून, मालिकांमध्येही भूमिका केल्या आहेत. विविधांगी भूमिका करणाऱ्या आलोक नाथ यांनी अनेक कलाकारांच्या वडिलांची प्रभावी भूमिका साकारली आहे. वडिलांच्या व्यक्तिरेखांमधील त्यांच्या सहज आणि प्रभावी अभिनयामुळे त्यांची स्वतंत्र ओळख निर्माण झाली. अगदी त्यांनी ‘अग्निपथ’ चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्या वडिलांची भूमिका साकारली होती. विशेष म्हणजे वास्तविक आयुष्यात अमिताभ बच्चन हे आलोक नाथ यांच्यापेक्षा सुमारे १४ वर्षांनी मोठे आहेत. या चित्रपटात अमिताभ यांनी विजय दीनानाथ चौहान; तर आलोक नाथ यांनी मास्टर दीनानाथ चौहान ही भूमिका साकारली होती.
३४ वर्षाचे असताना आलोकनाथ झाले अमिताभ यांचे वडील
‘अग्निपथ’मध्ये काम करताना आलोक नाथ अवघे ३४ वर्षांचे होते; तर अमिताभ बच्चन ४८ वर्षांचे होते. कमी वय असताना आणि इतर भूमिका करीत असताना त्यांनी करिअरमध्ये मोठी रिस्क घेतली. त्या काळात करिअरच्या सुरुवातीच्या टप्प्यावर असतानाच स्वतःपेक्षा मोठ्या सुपरस्टारच्या वडिलांची भूमिका स्वीकारणे हे त्यांच्यासाठी आव्हान होते. मात्र, त्यांनी हे आव्हान स्वीकारत आपल्या अभिनयाने ती भूमिका प्रभावीपणे साकारली.
१९९० मध्ये प्रदर्शित झालेल्या अग्निपथ या चित्रपटात मिथुन चक्रवर्ती, टीनू आनंद, डॅनी डेन्झोंग्पा, नीलम कोठारी व अर्चना पूरण सिंह यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन मुकुल एस. आनंद यांनी केले होते; तर यश जोहर यांनी निर्मिती केली होती. प्रदर्शनाच्या वेळी ‘अग्निपथ’ला बॉक्स ऑफिसवर अपेक्षित यश मिळाले नव्हते. मात्र, कालांतराने या चित्रपटाला ‘कल्ट क्लासिक’चा दर्जा मिळाला. पुढे २०१२ मध्ये अग्निपथ या चित्रपटाचा रिमेकही प्रदर्शित करण्यात आला. त्यामध्ये हृतिक रोशन आणि प्रियंका चोप्रा यांच्या प्रमुख भूमिका होत्या.
आलोक नाथ यांचा जन्म १० जुलै १९५६ रोजी बिहारमधील खगडिया जिल्ह्यात झाला. १९८० च्या दशकात त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. प्रेमळ, सुसंस्कृत आणि कुटुंबवत्सल वडिलांच्या भूमिकांमुळे त्यांना ‘बाबूजी’ म्हणून विशेष लोकप्रियता मिळाली. ‘मैने प्यार किया’, ‘हम आपके हैं कौन’, ‘हम साथ साथ हैं’, ‘विवाह’, ‘परदेस’, ‘ताल’, ‘सोनू के टीटू की स्वीटी’ यांसारख्या अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये त्यांनी लक्षवेधी भूमिका साकारल्या. चित्रपटांबरोबरच ‘बुनियाद’, ‘सपना बाबुल का…’, बिदाई’ यांसारख्या लोकप्रिय मालिकांमध्ये भूमिका केल्या आहेत.
