बॉलीवूडचे शेहनशाह म्हणजेच ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनी आजवर गेली पाच दशके आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. आपल्या भूमिकांमुळे चर्चेत राहणारे अमिताभ सोशल मीडियावरही चांगलेच सक्रिय असतात. अमिताभ बच्चन त्यांच्या एक्स हँडलद्वारे चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. एक्सवर ते रोज किंवा दिवसाआड काही ना काही पोस्ट शेअर करत असतात. या पोस्टमुळे त्यांना अनेकदा टीकेलाही सामोरे जावे लागते.

अमिताभ बच्चन केवळ पोस्टच शेअर करत नाहीत, तर ते चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तरंही देतात. अशातच आता पुन्हा एकदा त्यांची एक पोस्ट व्हायरल होत आहे. खरंतर, सोशल मीडियावर एका व्यक्तीने अमिताभ बच्चन यांना ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. पण अमिताभ यांनी त्या व्यक्तीला योग्य उत्तर दिले आणि नंतर त्यांची पोस्ट काढून टाकली. नेमकं प्रकरण काय? चला जाणून घेऊ.

सोमवार, ९ जून रोजी पहाटे अमिताभ यांनी एक्सवर “T 5405 – Gadgets break.. Longevity lasts” अशी पोस्ट शेअर केली. अमिताभ यांनी ही पोस्ट शेअर करताच नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया व्यक्त करण्यास सुरुवात केली. तेव्हा एक नेटकऱ्याने अमिताभ बच्चन यांना ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. पण अमिताभ यांनी त्या व्यक्तीला योग्य उत्तर दिले. त्यांच्या या उत्तराचे अनेक स्क्रीनशॉट सध्या व्हायरल होत आहेत.

अमिताभ यांच्या पोस्टवर नेटकऱ्याने “शेहनशाह! इतक्या रात्रीपर्यंत तुम्ही जागे का आहात? झोपा आता तुमचं वय झालं आहे.” असं म्हटलं. नेटकऱ्याच्या या प्रतिक्रियेवर अमिताभ बच्चन उत्तर देत म्हणाले, “देवाची इच्छा असेल तर एक दिवस तूही म्हातारा होशील.” अमिताभ यांनी हे ट्विट काही वेळातच डिलीट केले, परंतु आता त्याचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे आणि लोक त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.

अमिताभ बच्चन एक्स पोस्ट स्क्रीनशॉट
अमिताभ बच्चन एक्स पोस्ट स्क्रीनशॉट

बिग बींच्या या पोस्टवर आणखी एका व्यक्तीने कमेंट करत “वेळेवर झोपा, नाहीतर तुम्ही जास्त काळ जगणार नाही” असं म्हटलं. नेटकऱ्याच्या या प्रतिक्रियेवर अमिताभ बच्चन उत्तर देत म्हणाले, “माझ्या मरणावर बोलल्याबद्दल धन्यवाद, देवाची कृपा.” दरम्यान अमिताभ हे त्यांच्या विविध सोशल मीडिया पोस्टमुळे कायमच चर्चेत येत असतात. अशातच त्यांनी नेटकऱ्यांना त्यांच्या खास शैलीत उत्तरं दिली आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, अमिताभ बच्चन नुकतेच ‘वेत्तैयन’मध्ये दिसले होते. यानंतर ते आता ‘कल्की २८९८ एडी’चा दुसरा भाग ‘सेक्शन ८४’ आणि ‘ब्रह्मास्त्र भाग २: देव’ या चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. तसंच या वर्षाच्या अखेरीस ‘कौन बनेगा करोडपती’च्या नवीन सीझनद्वारेही ते प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं म्हटलं जातं आहे. त्यामुळे त्यांच्या आगामी कामांची चाहत्यांना उत्सुकता आहे.