Amitabh Bachchan on Dharmendra: १९७५ मध्ये ‘शोले’ सिनेमा प्रदर्शित झाला होता. हा सिनेमा आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. हा सिनेमा जितका गाजला, तितकीच या सिनेमातील जय व वीरू ही जोडीसुद्धा गाजली. त्या चित्रपटात जय ही भूमिका अमिताभ बच्चन यांनी साकारली होती; तर वीरूच्या भूमिकेत दिवगंत अभिनेते धर्मेंद्र दिसले होते.

अमिताभ बच्चन व धर्मेंद्र यांनी फक्त ‘शोले’मध्येच एकत्र काम केले असे नाही. त्यांनी अनेक हिंदी सिनेमांत स्क्रीन शेअर करीत महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. राम बलराम, चुपके चुपके, नसीब, हम कौन है अशा अनेक सिनेमांत त्यांनी एकत्र काम केले. स्क्रीनवरील त्यांच्या भूमिकांना मोठ्या प्रमाणात पसंती मिळाली. विशेष म्हणजे हे दोन्ही दिग्गज कलाकार खऱ्या आयुष्यातही उत्तम मित्र होते. अमिताभ बच्चन यांनी नुकतीच धर्मेंद्र यांची एक आठवण सांगितली. त्यामुळे हे दोन्ही कलाकार पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

“चार-पाच लोक घराच्या पायऱ्या…”

‘कौन बनेगा करोडपती’च्या मंचावर अमिताभ बच्चन यांनी धर्मेंद्र यांची आठवण सांगितली. ते म्हणाले, “धर्मेंद्र यांच्या घरी कोणीही येऊ शकत असे. सगळ्यांसाठी त्यांच्या घराचे दरवाजे उघडे असत. मला आठवतं की, धरमजी एकदा घरी आले आणि त्यांनी पाहिलं की चार-पाच लोक घराच्या पायऱ्या चढून वर येत होते. त्यांनी त्यांना विचारले की, तुम्ही कोण आहात? आणि तुम्ही इथे काय करीत आहात? त्या लोकांनी त्यांना सांगितले की, ते त्यांच्या गावाहून आले आहेत. त्यानंतर धर्मेंद्र यांनी असा अंदाज बांधला की, त्यांच्या पत्नीने त्यांना बोलावले असेल. त्यांच्या घरी किती लोक येत आहेत आणि किती जात आहेत, याबद्दल धर्मेंद्र यांना माहीत नसायचे. ते कायमच सगळ्यांचे प्रेम आणि आदराने स्वागत करीत असत. त्यांचे मन खूप मोठे होते.”

धर्मेंद्र यांचे २०२५ मध्ये निधन झाले. त्या वेळीही अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करीत धर्मेंद्र यांच्याबद्दलच्या भावना व्यक्त केल्या होत्या. ते मोठ्या मनाचे होते, असे त्यावेळी त्यांनी लिहिले होते. तसेच, त्यांच्या साधेपणाचादेखील उल्लेख केला होता. त्यांनी असेही लिहिले होते की, प्रत्येक दशकात चित्रपटसृष्टी बदलत गेली; मात्र धर्मेंद्र बदलले नाहीत. त्यांच्या जाण्याने एक पोकळी निर्माण झाली आहे, जी कधीही भरून निघणार नाही.

दरम्यान, अमिताभ बच्चन कौन बनेगा करोडपतीच्या मंचावर अनेक आठवणी सांगतात. सिनेमाच्या शूटिंगदरम्यान घडलेले किस्से, सहकलाकारांच्या आठवणी, तसेच अनेकदा त्यांच्या खासगी आयुष्यातील काही गोष्टींबद्दलही ते खुलासा करतात. त्याची कायम चर्चा होताना दिसते.