रेखा आणि अमिताभ बच्चन यांचं नातं हे भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील सर्वात चर्चेतलं प्रकरण आहे. ७० आणि ८० च्या दशकात ‘दो अनजाने’, ‘मुकद्दर का सिकंदर’, ‘मिस्टर नटवरलाल’ आणि ‘सिलसिला’ यांसारख्या चित्रपटांमधून त्यांची पडद्यावरील केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड भावली. केवळ पडद्यावरच नव्हे, तर खऱ्या आयुष्यातही त्यांच्यातील कथित जवळीक, ऑफ-स्क्रीन बाँडिंग आणि बॉलीवूडच्या गॉसिप्समध्ये रंगलेली त्यांची प्रेमकथा आजही चाहत्यांसाठी उत्सुकतेचा विषय आहे. अधिकृतपणे या दोघांनी आपल्या नात्यावर कधीही जाहीर शिक्कामोर्तब केलं नसलं, तरीही रेखा यांनी आपलं अमिताभ यांच्यावर प्रेम असल्याची कबुली अनेकदा दिलीये.
अमिताभ बच्चन आणि रेखा दोघांपैकी एकाचं नाव जरी घेतलं की दुसरं नाव आपोआप आठवतं. ७० च्या दशकात त्यांचं अफेअर होतं आणि ८० च्या दशकाच्या सुरुवातीला त्यांच्यातील नातं संपलं. तेव्हापासून आजतागायत त्यांच्या नात्याबद्दल अनेक चर्चा रंगल्या आहेत. अनेकदा त्यांच्या नात्याबद्दल बरेच खुलासे होत असतात. आता एका प्रसिद्ध फोटो जर्नलिस्टने या दोन्ही दिग्गज कलाकारांबद्दल एक मोठं गुपित उघड केलं आहे. त्यांच्या मते, रेखा या अमिताभ बच्चन यांच्या कामाची पद्धत आणि त्यांच्या सवयी स्वतःमध्ये आणू लागल्या होत्या.
यश मिळाल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी सवयी बदलल्या
जुन्या काळातील फोटो जर्नलिस्ट सुरेश जेठवा यांनी नुकतीच ‘हिंदी रश’ला एक मुलाखत दिली. त्यांनी सांगितलं की, यश मिळाल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी आपल्या सवयी बदलल्या होत्या. ते खूप मर्यादित वागायचे. त्यांच्या मते, अमिताभ हे सुरुवातीपासूनच कमी बोलणारे व्यक्ती होते, पण त्यांचे चित्रपट हिट होऊ लागल्यानंतर त्यांनी आपला स्वभाव आणखी बदलला. ते खूप मोजक्या लोकांनाच भेटायचे आणि बोलायचे.
अमिताभ बच्चन यांची कॉपी करू लागल्या होत्या रेखा
सुरेश जेठवा यांना पुढे अमिताभ आणि रेखा यांच्या नात्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला, त्यावर ते म्हणाले, “मी एक गोष्ट पाहिली होती, जेव्हा अमिताभ बच्चन यांचे चित्रपट हिट होऊ लागले तेव्हा त्यांनी प्रत्येक गोष्टीपासून अंतर राखायला सुरुवात केली. ते खूप मोजक्या लोकांशी बोलायचे. त्यांची हीच स्टाईल नंतर रेखा यांनीही फॉलो करायला सुरुवात केली. आधी रेखा अशा नव्हत्या; त्या सर्वांना भेटायच्या, बोलायच्या. पण नंतर त्यांनीही सर्वांपासून अंतर राखायला सुरुवात केली. कारण अमिताभ यांच्याबरोबरचे त्यांचे चित्रपट हिट होत होते आणि रेखा यांचं करिअर यशस्वी होत होतं.”
अमिताभ बच्चन यांना विचारूनच सगळं करायच्या रेखा
सुरेश जेठवा पुढे म्हणाले, “मिस्टर नटवरलाल चित्रपट हिट झाल्यानंतर या दोघांची जोडी प्रेक्षकांना खूप आवडू लागली होती. मी पाहिलं होतं की रेखा अमिताभ यांच्याप्रमाणेच काम करायच्या. असं वाटायचं की त्या अमिताभ यांना विचारूनच सगळं करायच्या— जसं की, फोटो देऊ की नको? इंटरव्ह्यू देऊ की नको? ज्यांच्याशी त्यांचं चांगलं जमायचं, त्या फक्त त्यांच्याशीच बोलायच्या. नवीन लोकांशी त्या फारशा बोलायच्या असं मला तरी वाटत नाही,” असा दावा त्यांनी केला.
‘मिस्टर नटवरलाल’, ‘सिलसिला’, ‘नमक हराम’, ‘दो अनजाने’, ‘आलाप’, ‘खून पसीना’, ‘गंगा की सौगंध’, ‘मुकद्दर का सिकंदर’, ‘सुहाग’ आणि ‘राम बलराम’ हे अमिताभ बच्चन व रेखा यांचे गाजलेले चित्रपट आहेत.
