Amitabh Bachchan on Retirement Rumors Clarification: बॉलीवूडचे बिग बी अमिताभ बच्चन हे सध्या ‘कौन बनेगा करोडपती’ या शोचे सूत्रसंचालन करीत आहेत. त्याचबरोबर ते सोशल मीडियावर ब्लॉग लिहीत त्यांच्या भावना व्यक्त करीत असतात. अमिताभ बच्चन यांच्या एका ब्लॉगमध्ये ‘रिटायर्डमेंट’ हा शब्द आल्याने, त्यांना कामातून निवृत्त व्हायचे असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. मात्र, ही ‘रिटायर्डमेंट’ कामासंबंधित नसल्याचा खुलासा स्वतः अमिताभ बच्चन यांनी केला आहे.

अमिताभ बच्चन हे ब्लॉगच्या माध्यमातून दररोज चाहत्यांशी संवाद साधत असतात. पण त्यांनी एका ब्लॉगमध्ये KBC चे अनुभव शेअर करताना ‘रिटायर्डमेंट’ शब्दाचा वापर केल्याने अनेकांनी त्यावरून निवृत्तीबाबत अंदाज केला. मात्र, अमिताभ बच्चन यांनी कामाबाबत नाही, तर दिवस संपल्याने झोपण्यासाठी जाण्याच्या दृष्टीने रिटायर्डमेंट हा शब्द वापरल्याचे त्यांनी स्वतः स्पष्ट केले आहे.

अमिताभ बच्चन यांनी सांगितला खरा अर्थ

सोशल मीडियावर नवीन ब्लॉगमध्ये अमिताभ बच्चन यांनी एका दैनिकातील बातमीचा फोटो शेअर केला. बिग बींनी लिहिले, “मी ब्लॉगमध्ये लिहिले होते… ‘ आता उशीर झाला आहे, निवृत्त होण्याची वेळ झाली आहे…’ याचा अर्थ आपल्या सर्वांना माहीतच आहे की – ‘उशीर झाल्यामुळे झोपायला हवे, असा होतो. पण सर्वांना ‘योग्य’ माहिती देणाऱ्या मीडियाने असा अर्थ काढला.”

पुढे त्यांनी लिहिले, “नाही, मी कामातून निवृत्त होत नाहीये. इंग्रजी भाषेत याचा अर्थ, मी आता झोपायला जातो आहे, असा होतो. तसेच तिथे बाकी इतर कोणालाही येण्याची परवानगी नाही.”

https://www.tumblr.com/srbachchan/827758415665414144

दरम्यान, अमिताभ बच्चन हे सध्या ‘कौन बनेगा करोडपती’चे १८ वे पर्व घेऊन आले आहेत. यावेळी त्यांनी एका स्पर्धकाशी बोलताना त्यांची कोणती इच्छा आजपर्यंत अपूर्ण राहिली आहे, याबद्दल सांगितले. ते म्हणाले, “माझी इच्छा असतानाही मी कधीच गाणं शिकलो नाही. लोक खूप चांगलं गातात किंवा सतारसारखी वाद्यं वाजवतात, त्यावेळी मला थोडं वाईट वाटतं. ते इतक्या उत्तमपणे कसं गाऊ शकतात, याबद्दल मला कायमच आश्चर्य वाटतं. मी कधीच हे शिकलो नाही.”