अमिताभ बच्चन यांना बिग बी, बॉलीवूडचे महानायक अशा अनेक नावांनी संबोधलं जातं, पण तुम्हाला माहीत आहे का त्यांच्या पत्नी अभिनेत्री जया बच्चन त्यांना कोणत्या नावाने हाक मारायच्या? लग्नानंतर जया बच्चन याही अमिताभ बच्चन यांना एका खास नावाने बोलवायच्या. असं अमिताभ बच्चन यांनी ‘कौन बनेगा करोडपती’मध्ये सांगितलं आहे. अमिताभ बच्चन नेमकं काय म्हणाले जाणून घेऊ.

अमिताभ बच्चन यांनी सांगितला किस्सा

अमिताभ बच्चन आणि जया बच्चन या दोघांच्या उंचीतील फरकाची अनेकदा चर्चा होत असते. नुकत्याच ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमाच्या एका भागात अमिताभ बच्चन यांनी एक मजेशीर किस्सा सांगितला. या भागात रणबीर कपूर, रवी दुबे आणि साई पल्लवी हे त्यांच्या आगामी ‘रामायण’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी उपस्थित होते. त्यावेळी अमिताभ यांनी सांगितलं की, जया बच्चन त्यांना गंमतीने ‘लंबूजी’ असं म्हणत चिडवायच्या. मात्र, अमिताभ यांचे वडील आणि प्रसिद्ध कवी हरिवंशराय बच्चन यांना जया यानी त्यांना या नावाने हाक मारणं अजिबात आवडत नव्हतं. त्यामुळे त्यांनी लवकरच जया यांना असं म्हणण्यापासून रोखलं.

जया यांच्याबद्दलचा हा किस्सा सांगताना अमिताभ बच्चन म्हणाले की, जया अनेक वर्षांपासून त्यांना ‘लंबूजी’ या नावाने हाक मारायच्या. मात्र, नंतर त्यांच्या वडिलांनी जया यांना या नावाने हाक मारण्यापासून रोखलं.अमिताभ यांना या नावाने हाक मारण्याऐवजी त्यांच्या नावाने किंवा दुसऱ्या कोणत्याही नावाने हाक मारण्यास त्यांनी सांगितलं. त्यानंतर जया यांनी अमिताभ यांना त्यांच्या नावाने हाक मारण्यास सुरुवात केली. अमिताभ यांनी सांगितलं, “अनेक वर्षे ती मला लंबूजी म्हणायची. नंतर तिला मला या नावाने हाक मारू नकोस, असं सांगण्यात आलं. बाबूजी म्हणाले, हे बघ, त्याला या नावाने हाक मारू नकोस. एकतर त्याच्या नावाने हाक मार किंवा दुसरं काहीतरी नाव ठेव. त्यानंतर ती मला माझ्या नावाने हाक मारू लागली.”

या संवादाची सुरुवात बच्चन कुटुंबातील सदस्य आणि रणबीर कपूरच्या कुटुंबातील सदस्य यांच्या उंचीतील फरकाच्या चर्चेने झाली. रणबीरनेही त्याच्या व आलियामधील उंचीतील फरकाबद्दल सांगितलं. यावर अमिताभ बच्चन यांना हसू आवरलं नाही. दोन्ही कुटुंबांतील सदस्यांच्या उंचीत बराच फरक असल्याचं ते म्हणाले. त्यानंतर रणबीरने अमिताभ आणि जया बच्चन यांच्या उंचीतील फरकाबद्दल विचारलं. त्यावर अमिताभ यांनी आपली उंची ६ फूट २ इंच असल्याचं सांगितलं. तर जया बच्चन यांची उंची साधारण ५ फूट ३ किंवा ४ इंच असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. यावर रणबीरने गंमतीने आपली उंची जया बच्चन यांच्या उंचीच्या जवळपास असल्याचं म्हटलं.

दरम्यान, रणबीर कपूरचा ‘रामायण’ हा चित्रपट येत्या ५ नोव्हेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. रणबीर कपूर, साई पल्लवी मुख्य भूमिकेत असलेल्या या चित्रपटाचं सध्या जोरदार प्रमोशन सुरू आहे.