Amitabh Bachchan reveals he is related to Saif Ali Khan: भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रतिष्ठित बच्चन आणि पतौडी कुटुंब एकमेकांशी खास नात्याने जोडले गेले आहेत, असा खुलासा खुद्द अमिताभ बच्चन यांनी केला आहे. प्रियदर्शन दिग्दर्शित ‘हैवान’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अक्षय कुमार आणि सैफ अली खान यांनी ‘कौन बनेगा करोडपती’च्या मंचावर हजेरी लावली होती. याच वेळी बिग बींनी “मी आणि सैफ नातेवाईक आहोत” असे सांगताच सैफ आणि अक्षय कुमार दोघेही अवाक झाले.
भारतीय चित्रपटसृष्टीत कपूर कुटुंब, बच्चन, कोनिडेला, अल्लू, अक्किनेनी, दग्गुबाती आणि सलीम खान यांसारखी अनेक नावाजलेली कुटुंबे आहेत. विशेष म्हणजे, यातील काही कुटुंबियांमध्ये लग्नसबंध जुळल्यामुळे ही नाती अधिकच घट्ट झाली आहेत. पण अमिताभ बच्चन यांनी ते आणि सैफ अली खान एकमेकांचे नातेवाईक असल्याचा खुलासा केला, हे ऐकून सैफलाही आश्चर्याचा मोठा धक्का बसला.
प्रियदर्शन दिग्दर्शित ‘हैवान’ या आगामी क्राईम थ्रिलर चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सैफ आणि अक्षय कुमार यांनी ‘कौन बनेगा करोडपती’ शोमध्ये हजेरी लावली. यावेळी अमिताभ बच्चन यांनी हा खुलासा केला. या खुलाशामुळे सैफ, अक्षयसह प्रेक्षकही थक्क झाले. विशेष म्हणजे, हे नातं करीना कपूरच्या कुटुंबाशी आहे.
अमिताभ बच्चन आणि सैफ अली खान खरंच नातेवाईक आहेत का?
अमिताभ बच्चन म्हणाले, “खूप लोकांना हे माहीत नाही, पण सैफ माझा नातेवाईक आहे.” हे ऐकून आश्चर्यचकित झालेल्या सैफने विचारले, “मी?” अक्षय कुमारही हे ऐकून अवाक झाला. अमिताभ पुढे म्हणाले, “राज कपूर यांची मुलगी रितू कपूर यांचा मुलगा निखिल नंदा यांच्याशी माझी मुलगी श्वेता बच्चनचं लग्न झालंय.”
करीना कपूर ही राज कपूर यांचे चिरंजीव रणधीर कपूर आणि बबिता यांची मुलगी आहे. त्यामुळे करीना आणि निखिल नंदा हे आत्ये-मामे भावंड लागतात. करीनाने सैफशी लग्न केल्यामुळे पतौडी तसेच कपूर घराणे एकमेकांशी जोडले गेले आहेत.
खुलासा ऐकताच सैफ अली खानची प्रतिक्रिया
अमिताभ यांनी पुढे गमतीत विचारलं, “तर आता मला हे जाणून घ्यायचंय की मी करीनाला काय म्हणावं? आणि करीना मला काय म्हणेल?” त्यावर सैफ त्याच्या खास शैलीत म्हणाला, “देवाचे आभार, हा केबीसीतील प्रश्न नव्हता.” हे ऐकून अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार दोघेही हसू लागले.
दरम्यान, अमिताभ बच्चन आणि करीना कपूर यांनी ‘कभी खुशी कभी गम’ (२००१), ‘देव’ (२००४) आणि ‘सत्याग्रह’ (२०१३) या चित्रपटांमध्ये एकत्र काम केलंय. तर अमिताभ यांनी सैफबरोबर ‘आरक्षण’ (२०११) आणि ‘एकलव्य: द रॉयल गार्ड’ (२००७) मध्ये स्क्रीन शेअर केली आहे.
