Amitabh Bachchan on Jaya Bachchan: अमिताभ बच्चन यांच्याबद्दल अनेक गोष्टी प्रेक्षकांना माहीत आहेत. पण, तरीही त्यांच्याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी प्रेक्षक कायम उत्सुक असतात. सध्या अमिताभ बच्चन ‘कौन बनेगा करोडपती’ या शोचे सूत्रसंचालन करीत आहेत.
‘कौन बनेगा करोडपती’चा १८ वा सीझन काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हा शो सुरू झाल्यापासून मोठ्या चर्चेत आहेत. शोमध्ये सहभागी होणारे स्पर्धक, त्यांचे बिग बींबरोबरचे संभाषण, त्यांना त्यांच्याबद्दल विचारलेले प्रश्न या सगळ्याचीच सध्या चर्चा होत असल्याचे दिसत आहे. आता एका स्पर्धकाने त्यांना थेट जया बच्चन यांच्याबद्दल प्रश्न विचारला. केबीसीच्या मंचावर नेमकं काय घडलं, याबद्दल जाणून घेऊ…
“प्रत्येक पतीने हे मान्य केले पाहिजे…”
बिहारचे बबलू कुमार पंडित हे कौन बनेगा करोडपतीच्या शोमध्ये सहभागी झाले होते. ते जेव्हा बिग बींना भेटले, त्यावेळी ते भावूक झाले. ते म्हणाले की, अनेक वर्षांपासून मी केबीसीमध्ये येण्याचा प्रयत्न करीत होतो. मी इथे येऊन हॉट सीटवर बसावे, अशी माझ्या कुटुंबाची, तसेच माझ्या नातेवाइकांचीही इच्छा होती. माझी पत्नी माझ्यासाठी भाग्यवान आहे.
खेळ पुढे सरकल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी बबलू कुमार पंडित यांचे सोशल मीडियावरील प्रोफाईल पाहिले. तिथे ‘बीवी पगलू’, असे लिहिले होते. ते पाहिल्यानंतर अमिताभ बच्चन विनोद करीत म्हणाले, “मला तर वाटले की, तुम्ही श्रम मंत्रालयामध्ये काम करता. इथे तर तुम्ही पत्नीची कामे करत असल्याचे दिसते. त्यावर बबलू हसत म्हणाला, “सर, पुरुष फक्त बायकोची नोकरी करतो.” त्याचे उत्तर ऐकून अमितभ बच्चन सहमती दर्शवीत विनोदाने म्हणाले, “ही खरी गोष्ट आहे. पत्नी मालकीण असते. प्रत्येक पतीने हे मान्य केले पाहिजे आणि तरच ते जिवंत राहू शकतात.”
त्यावर बबलू यांनी अमिताभ बच्चन यांना विचारले की, तुम्ही ‘बीवी पगलू’ आहात का? त्यावर अमिताभ बच्चन म्हणाले, “मला कोणीही विचारले की, मी त्यांना सांगतो की, मी जयाजींचा पती आहे”, अमिताभ बच्चन यांचे उत्तर ऐकून उपस्थित असलेले सर्व जण हसताना दिसले.
दरम्यान, कौन बनेगा करोडपतीच्या अठराव्या पर्वात काही बदल झाले आहेत. ‘फास्टेस्ट फिंगर फर्स्ट’च्या जागी ‘फास्टेस्ट बझर फर्स्ट’ आणण्यात आले आहे. त्याशिवाय, ‘बझर बट्टू’देखील सुरू करण्यात आला आहे. बझर दाबणाऱ्या पहिल्या तीन स्पर्धकांना प्रश्नाचे उत्तर देण्याची संधी दिली जाईल. अचूक उत्तर देणारा स्पर्धक हॉट सीटवर जाईल.
