Amitabh Bachchan on Commitments: अमिताभ बच्चन हे त्यांच्या कामाप्रति समर्पित असतात आणि त्याबद्दल त्यांचे अनेक सहकलाकार वेळोवेळी बोलले आहेत. ते ठरलेल्या वेळेच्या आधी येतात, इतर कलाकारांशी प्रेमाने बोलतात. सीन उत्तम व्हावा यासाठी ते कायम प्रयत्न करीत असतात, असे अनेक कलाकारांनी सांगितले आहे. आता त्यांचे वय ८३ वर्षे आहे. ते आजही अविरतपणे त्यांचे काम करीत असल्याचे पाहायला मिळत आहे.

‘कौन बनेगा करोडपती’च्या १८ व्या सीझनला सुरुवात झाली आहे. अमिताभ बच्चन दरवर्षीप्रमाणे या शोचे सूत्रसंचालन करीत आहेत. तसेच, अमिताभ बच्चन लवकरच कल्की २९८९ एडी २ या सिनेमातूनही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. कामात इतके व्यग्र असूनही बिग बी ब्लॉगद्वारेही प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात.

अमिताभ बच्चन नेमकं काय म्हणाले?

अमिताभ बच्चन सोशल मीडियावर सक्रिय असतात. ते त्यांच्या ब्लॉगमध्ये त्यांच्या आयुष्यातील विविध घटना, शूटिंगच्या ठिकाणी घडणारे प्रसंग, किस्से, काही आठवणी, आजच्या पिढीबद्दलचे मत, देशभरात चाललेल्या विविध घटना, तंत्रज्ञान, दैनंदिन जीवनातील चढ-उतार अशा अनेक गोष्टींबाबत बोलत असतात. आता त्यांनी नुकताच एक ब्लॉग शेअर केला आहे.

या ब्लॉगमध्ये त्यांनी सुरुवातीला लिहिले, “गेल्या काही दिवसांत मी नियमितपणे ब्लॉग लिहू शकलेलो नाही. त्यासाठी मला माफ करा. कामाचे तास आणि कामाची व्याप्ती यांमुळे ब्लॉगच्या माध्यमातून मला तुमच्याशी संवाद साधता आला नाही. त्यासाठी मनापासून सॉरी.”

त्यांनी पुढे लिहिले, “सकाळी ७ वाजता काम सुरू व्हायचे ते दुसऱ्या दिवशी सकाळी ७ पर्यंत काम सुरू असायचे. सलग २४ तास काम करावे लागले. आपण जेव्हा एखाद्या कामासाठी वचनबद्ध होतो, त्यावेळी ती वचनबद्धता पाळली पाहिजे. विशेष म्हणजे सगळ्याच्या आधी त्याला प्राधान्य दिले पाहिजे.”

अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ब्लॉग पोस्टमध्ये ते कोणत्या कामात इतके व्यग्र होते, याचाही खुलासा केला. कौन बनेगा करोडपती या शोच्या शूटिंगमध्ये ते व्यग्र होते. त्यांनी २४ तास शूटिंग केले. त्याबद्दल त्यांनी लिहिले की, आज सकाळी ७ वाजता माझे काम संपले. हे काम काल सकाळी ७ वाजता सुरू झाले होते. मात्र, त्याचे योग्य पद्धतीने सादरीकरण होणे आणि काम वेळेत पूर्ण करणे गरजेचे होते. त्यामुळे ते पूर्ण केले. तसेच, यापुढे नियमितपणे ब्लॉग लिहीन”, असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, अमिताभ बच्चन यांना मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते आतुर झाले आहेत. ते ‘कल्की २’ची वाट पाहत आहेत.