उदय टिकेकर हे मराठी इंडस्ट्रीतील ज्येष्ठ अभिनेते आहेत. त्यांनी मराठी नाटक, मालिका आणि चित्रपटांत आतापर्यंत विविध भूमिका साकारल्या आहेत. मराठीसह त्यांनी हिंदी व इग्रजी नाटक, चित्रपटांमध्येही काम केलं आहे. सकारात्मक, ग्रे शेड अशा विविध भूमिका साकारत त्यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आणि इंडस्ट्रीत वेगळी ओळख निर्माण केली. अशातच त्यांनी त्यांच्या कारकिर्दीतील काही किस्से, अनुभव आणि सहकलाकारांबद्दल सांगितलं आहे. यावेळी त्यांनी बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्याबद्दलही सांगितलं आहे.

उदय टिकेकर यांनी अनेक हिंदी चित्रपटांमध्ये विविध भूमिका साकारत लोकप्रिय कलाकारांबरोबर काम केलं आहे. त्यापैकीच एक म्हणजे बीग बी अमिताभ बच्चन. अशातच आता उदय यांनी यावेळी २०१५ साली आलेल्या ‘शमिताभ’ या थ्रिलर चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्याबरोबर काम केल्याची आठवण सांगितली आहे. यामध्ये दाक्षिणात्य अभिनेता धनुषसुद्धा होता. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत उदय यांनी याबद्दल सांगितलं आहे.

उदय टिकेकर यांनी सांगितला अमिताभ बच्चन यांचा किस्सा

उदय टिकेकर यांनी यावेळी अमिताभ बच्चन यांनी कसं आजारी असतानाही सीन केला होता आणि त्यावेळी त्यांची ती ऊर्जा पाहून त्यांनाही प्रोत्साहन मिळालं याबद्दल सांगितलं आहे. अमिताभ बच्चन यांच्याबद्दल उदय टिकेकर म्हणाले, “आम्ही शमिताभ नावाचा चित्रपट केला होता. मी त्यावेळी तीन दिवस त्यांच्याबरोबर काम केलं. एका सीनला ते आजारी पडले होते. मी डॉ.पांडे हे पात्र साकारलं होतं, पण त्यावेळी ते खरोखर आजारी पडले होते. त्यांचा पाय दुखत होता,दात दुखत होत, पण त्यांनी ज्या उर्जेने सीन केला तो कमाल होता”.

बिग बींबद्दल उदय टिकेकर पुढे म्हणाले, “त्या सीनमध्ये इंजेक्शन काढल्यानंतर ते आरडाओरडा करतात. मग धनुष आणि मी कसं बसं त्यांना पकडून इंजेक्शन देतो मग ते शांत होतात. चार वेळा टेक झाला आणि चारहीवेळा त्यांनी त्याच उर्जेने तो सीन केला. आमच्या क्लोज अप सीनसाठीसुद्धा त्यांनी तिच उर्जा ठेवली. दात दुखतोय, पाय दुखत होता तरी प्रत्येक सीनला तिच ऊर्जा होती. हे कोण करतं, आम्ही आता सांगतो मी नाहीये त्या सीनमध्ये मग तुम्ही त्यांच्याकडून करुन घ्या ना. पण, आम्ही त्यांच्याकडून शिकलो की नाही आपणही तिथे असलं पाहिजे म्हणजे तुमच्या सहकलाकाराला आधार मिळतो”. अभिजात मराठी फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी याबद्दल सांगितलं आहे.