भारतीय चित्रपटसृष्टीचे महानायक अमिताभ बच्चन हे कायम चर्चेत असतात. या वयातही त्यांची ऊर्जा, कामाप्रती असलेली निष्ठा आणि त्यांची मेहनत पाहून मोठमोठे कलाकारही अवाक होतात. इतकंच नाही तर ते सोशल मीडियावर तेवढेच सक्रिय असतात. फोटो, पोस्ट, ट्वीटच्या माध्यमातून ते आजच्या पिढीशी कायम जोडलेले असतात. त्यांच्या सोशल मीडियावर ते त्यांच्या चित्रपटाच्या काही जुन्या आठवणी शेअर करत असतात.
नुकतंच त्यांनी नव्या सोशल मीडिया पोस्टमधून त्यांच्या ‘ दो और दो पांच’ या चित्रपटाला ४३ वर्षं पूर्ण झाल्याची माहिती दिली. ही माहिती देताना अमिताभ यांनी त्या चित्रपटातील त्यांचा एक डॅशिंग लूकमधील फोटो शेअर केला आहे, ज्यात त्यांनी बेल बॉटम पॅन्ट परिधान केली आहे आणि त्यात ते एखादा अॅक्शन सीन करताना दिसत आहेत. ही पोस्ट शेअर करताना त्यांनी या बेल बॉटम पॅन्टमागचा एक धमाल किस्सा शेअर केला आहे.




आणखी वाचा : “ते माझा पाठलाग करत, भिंतींवर अश्लील गोष्टी…” सौम्या टंडनने सांगितला ‘तो’ धक्कादायक प्रसंग
पोस्ट शेअर करताना बच्चन लिहितात, “दो और दो पांच या चित्रपटाला ४३ वर्षं झाली. काय धमाल चित्रपट होता हा, आणि त्यातील बेल बॉटम पॅन्ट. एकेदिवशी मी तशीच बेल बॉटम पॅन्ट परिधान करून एका चित्रपटगृहात चित्रपट पहायला गेलो आणि अंधारात एक उंदीर माझ्या पॅन्टमध्ये शिरला, याचं संपूर्ण श्रेय जातं त्या बेल बॉटम पॅन्ट्ला.” या पोस्टवर त्यांच्या चाहत्यांनी धमाल कॉमेंटही केल्या आहेत.
याआधी काही दिवसांपूर्वी अशीच एक धमाल पोस्ट करत अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या दूसरा चित्रपट ‘रेशमा और शेरा’मधील त्यांचा एक लूक शेअर केला होता. नुकताच अमिताभ बच्चन यांचा ‘उंचाई’ हा सूरज बडजात्या यांच्याबरोबरचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. प्रेक्षकांनी या चित्रपटाला उदंड प्रतिसाद दिला. आता अमिताभ बच्चन हे प्रभास आणि दीपिका पदूकोणच्या ‘प्रोजेक्ट के’ या चित्रपटात दिसणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.