Amitabh Bachchan on routine: बॉलीवूडचे महानायक अशी अमिताभ बच्चन यांची ओळख आहे. ८३ वर्षीय बिग बी आजही विविध भूमिका, कौन बनेगा करोडपती हा शो, तसेच सोशल मीडिया या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येतात.
अमिताभ बच्चन त्यांनी भारतीय सिनेसृष्टीतील त्यांच्या ५७ वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी २०० हून अधिक सिनेमांत काम केले आहे. तसेच, ‘कौन बनेगा करोडपती’च्या १७ सीझनमधील १६ सीझनचे सूत्रसंचालन त्यांनी केले आहे. पण, याबरोबरच ते सोशल मीडियावर विविध पोस्ट शेअर करत सर्वांचे लक्ष वेधून घेतात.
ते त्यांच्या ब्लॉगमधून त्यांचे अनुभव सांगतात, किस्से सांगतात, तसेच एखाद्या गोष्टीबद्दल त्यांना काय वाटते याबद्दलही सांगतात. आता त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत रोजच्या रूटिनचा आयुष्यावर कसा परिणाम होतो, याबद्दल लिहिले आहे.
“माझी दिनचर्या ही अनेक वर्षांच्या…”
अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये लिहिले, “एक दिवस आळशीपणात गेला, त्याला काही खास कारण नव्हते. दररोज काम नसेल तर त्याचा मला त्रास होतो. माझी दिनचर्या ही अनेक वर्षांच्या शिस्त आणि सवयींमुळे तयार झाली आहे. ठरलेल्या गोष्टी वेळेत होत नाहीत, तेव्हा एक प्रकारचा असमतोल निर्माण होतो. एखाद्या दिवशी जर काम नसेल, शूटिंग नसेल त्या दिवशी गोष्टी विस्कळीत झाल्यासारख्या वाटतात.अगदी साध्या गोष्टीसुद्धा गोंधळात टाकतात.”
त्यांनी असेही लिहिले, “जेव्हा गोष्टी अपेक्षेप्रमाणे घडत नाहीत तेव्हा अनावश्यक ताण निर्माण होऊ शकतो. काही जणांना काम कमी प्रमाणात केल्याने किंवा कामाचा वेग कमी केल्याने शांतता मिळू शकते. पण, माझ्यासह अनेक जणांसाठी ते चिंतेचे कारण ठरू शकते. अशा प्रकारची अस्वस्थता मन आणि शरीर दोन्हीसाठी चांगली नसते, त्यामुळे ठराविक दिनक्रम असेल तर मन स्थिर राहण्यास मदत होते.”
अमिताभ बच्चन वर्षानुवर्षे सिनेसृष्टीमध्ये अविरतपणे काम करत आहेत. त्यांच्या कामात सातत्य आणि शिस्त दिसते. अनेक कलाकार त्यांच्या कामाप्रतिच्या समर्पणासाठी ओळखले जातात.
अमिताभ बच्चन यांच्या कामाबद्दल बोलायचे तर ते लवकरच ‘कल्की २’ या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.
