‘कौन बनेगा करोडपती १८’च्या नुकत्याच प्रसारित झालेल्या भागात अमिताभ बच्चन यांनी शूटिंगदरम्यान घसरून गुडघ्याला दुखापत झाल्याचा खुलासा केला. अमिताभ बच्चन नेहमी शोच्या मंचाच्या मध्यभागी उभं राहून त्यांचा खास ओपनिंग मोनोलॉग सादर करतात. मात्र, यावेळी दुखापतीमुळे त्यांनी बसूनच हा मोनोलॉग सादर केला.
या भागात अमिताभ बच्चन धावत आपल्या खुर्चीजवळ आले आणि लगेच खाली बसले. यावेळी त्यांनी सांगितलं, “सहसा मी मध्यभागी उभं राहून माझा मोनोलॉग करतो. पण आज माझ्या गुडघ्याला दुखापत झाली आहे. काल शूटिंगदरम्यान मी घसरून पडलो आणि माझ्या गुडघ्याला दुखापत झाली.” दुखापतीबद्दल सांगताना अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या डाव्या गुडघ्याकडे हात दाखवला. हे पाहून प्रेक्षक चिंतेत पडले. मात्र, अमिताभ यांनी लगेचच ही दुखापत गंभीर नसल्याचं स्पष्ट केलं.
स्पर्धकांचं सूत्रसंचालन करण्यासाठी ते उभे राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र, उभं राहण्यास थोडा त्रास होत असल्याने त्यांनी सुरुवातीचा मोनोलॉग बसूनच करण्याचा निर्णय घेतला. यानंतर प्रेक्षकांनी त्यांना लवकर बरे होण्यासाठी सांगितलं.
दरम्यान, अमिताभ बच्चन यांनी नुकत्याच केलेल्या एका ब्लॉग पोस्टमुळेही ते चर्चेत आले होते. यामध्ये त्यांनी मुलगा अभिषेक बच्चनबरोबरच्या नात्याबद्दल भाष्य केलं. आई-वडील आणि मुलांच्या मतांमध्ये फरक असू शकतो, मात्र तरीही त्यांच्यात एकमेकांना समजून घेण्याची भावना असू शकते, असं त्यांनी म्हटलं. अमिताभ यांनी लिहिलं, “पिता पुत्र दोनों रहें, एक मंच पर बैठें; विचार अलग-अलग हो चाहे, मंजिल की ही ओर हैं.” म्हणजेच, वडील आणि मुलगा एकाच मंचावर बसलेले असतात; त्यांची मतं वेगळी असली तरी दोघांचंही ध्येय एकच असतं.


पुढे त्यांनी दोघांमधील प्रेम आणि आदराबद्दलही लिहिलं. “पुढच्या पिढीबद्दल नेहमीच आदर असतो, पण ध्येय नेहमी एकच असत प्रत्येक वाटचालीचं तेच उद्दिष्ट असावं आणि हेच आमचं नातं राहिलं आहे. शोध घेणं, जाणून घेणं, समजून घेणं आणि सर्वांच्या हितासाठी समान ध्येय ठरवणं; प्रेम, आदर आणि शुभचिंतकांचं प्रेम,” असं त्यांनी म्हटलं.
