अलाहाबाद (आताचे प्रयागराज) येथून अभिनय क्षेत्रात नशीब आजमावण्यासाठी आलेले अमिताभ बच्चन पुढे हिंदी चित्रपटसृष्टीतील महानायक बनले, पण आपल्याला भविष्यात इतकं यश मिळेल याची कल्पना कदाचित त्यांनी तेव्हा केलीही नसेल. मात्र १९७० च्या दशकातील ‘अँग्री यंग मॅन’ म्हणून ओळख मिळण्यापूर्वी त्यांना मोठ्या संघर्षाचा सामना करावा लागला. सुरुवातीच्या काळात त्यांच्या अनेक चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर अपयश मिळालं. ‘परवाना’, ‘बन्सी बिरजू’, ‘प्यार की कहानी’ आणि ‘रेश्मा और शेरा’ यांसारखे चित्रपट सलग फ्लॉप ठरल्यानंतर १९७३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘जंजीर’ने अमिताभ बच्चन आयुष्य बदललं.
अलीकडेच विकी लालवानीला दिलेल्या मुलाखतीत अमिताभ बच्चन यांच्या ‘गहरी चाल’ या चित्रपटातील सहकलाकार अभिनेत्री बिंदू यांनी एक आठवण सांगितली. सलग चित्रपट फ्लॉप ठरल्यानंतर अमिताभ बच्चन जवळपास आपल्या मूळ गावी परत जाण्याच्या तयारीत होते. असं त्या म्हणाल्या. परंतु, त्यावेळी एका चिनी हेअर ड्रेसरने दिलेल्या सलल्यामुळे त्यांनी निर्णय बदलला.
बिंदू म्हणाल्या, “जंजीर इतका हिट ठरेल, अशी मला अजिबात अपेक्षा नव्हती. ते अमिताभजींचं नशीब होतं. त्यानंतर त्यांच्या जंजीर, दीवार आणि शोलेसारख्या चित्रपटांनी सलग यश मिळवलं. मला आठवतं, आम्ही १९७३ मध्ये मद्रासमध्ये गहरी चालचं चित्रीकरण करत होतो.” यावेळी बिंदू यांनी अमिताभ बच्चन यांच्या अभिनयाचंही भरभरून कौतुक केलं.
बिंदू पुढे त्या म्हणाल्या, “गहरी चालमध्ये अमिताभजींची भूमिका खूप प्रभावी होती. या चित्रपटात त्यांनी हेमा मालिनी यांच्या भावाची भूमिका साकारली होती. मात्र दुर्दैवाने हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालला नाही. चित्रपट अपयशी ठरल्यानंतर अनेकांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं. पण ते उत्कृष्ट कलाकार होते आणि प्रत्येक भूमिकेत त्यांनी उत्तम काम केलं”. बिंदू यांनी पुढे एक भावनिक प्रसंग सांगितला. त्यांच्या मते, त्यांच्याबरोबर असलेल्या चिनी हेअरड्रेसरनेच अमिताभ बच्चन यांना मुंबई सोडून जाऊ नका, सर्व काही लवकरच ठीक होईल, असं म्हणत धीर दिला होता.
बिंदू अमिताभ बच्चन यांच्याबद्दल म्हणाल्या, “आम्ही एकदा विमानाने एकत्र प्रवास करत होतो. माझी चिनी हेअरड्रेसरही माझ्याबरोबर होती. तिला सगळेजण ओळखत होते. तिने हेलनजींबरोबरही खूप काम केलं होतं. त्या काळात अमिताभजींचा बन्सी बिरजू आणि आणखी एक-दोन चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरले होते. मला अजूनही आठवतं, विमानात ते म्हणाले होते, माझे चित्रपट सतत फ्लॉप होत आहेत. आता पुढे काय होईल, काहीच समजत नाही. बहुतेक अलाहाबादला परत जाण्याचं विमानाचं तिकीट काढावं लागेल.”
चिनी हेअरड्रेसरने दिलेला सल्ला
बिंदू यांनी पुढे सांगितलं, “माझ्या हेअरड्रेसर लगेच त्यांना धीर देत म्हटलं, नाही, असं अजिबात म्हणू नका. सर्व काही ठीक होईल. तो प्रसंग आजही माझ्या लक्षात आहे. त्यानंतर अमिताभजींचे एकामागोमाग एक चित्रपट सुपरहिट ठरले आणि मग त्यांनी कधीच मागे वळून पाहिलं नाही.” बिंदू आणि अमिताभ बच्चन यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे. ‘अभिमान’, ‘गहरी चाल’, ‘जंजीर’ आणि ‘गंगा की सौगंध’ या चित्रपटांमध्ये या दोघांची जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळाली.
