बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन सध्या त्यांच्या ‘कौन बनेगा करोडपती’ सीझन १८ या कार्यक्रमामुळे चर्चेत आहेत. यादरम्यान अमिताभ बच्चन अनेकदा त्यांच्या खासगी व व्यावसायिक आयुष्यातील गमतीशीर किस्से सांगत असतात. अनेकदा आयुष्यात आलेल्या चढ-उतारांचाही ते यावेळी उल्लेख करतात. अशातच आता त्यांनी विवाहित पुरुषांना गंमत करत एक सल्ला दिला आहे.
अमिताभ बच्चन यांनी ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमाच्या सेटवर उपस्थित पुरुषांना त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाची तारीख नेहमी लक्षात ठेवण्याचा सल्ला दिला आहे. तारीख विसरल्यास होणाऱ्या परिणामांचाही त्यांनी यावेळी उल्लेख केला आहे.
अमिताभ बच्चन यांनी दिला सल्ला
अमिताभ बच्चन यांनी ‘कौन बनेगा करोडपती १८’च्या नुकत्याच प्रसारित झालेल्या भागात लग्नाबाबत आणखी एक मजेशीर किस्सा सांगितला. बिग बींनी शो पाहणाऱ्या सर्व पुरुषांना लग्नाची तारीख विसरू नका, असा मिश्कील इशारा दिला. लग्नाची तारीख विसरल्यास काय होऊ शकतं, याबाबत त्यांनी पुरुषांना चक्क “बूट, चप्पल आणि लाटणं तुमच्याकडे फेकलं जाऊ शकतं तयार राहा” असा मजेशीर सल्ला दिला.
‘कौन बनेगा करोडपती १८’च्या एका भागात अमिताभ बच्चन यांनी सांगितलं, “सर्व नवऱ्यांनी माझं नीट ऐका. ज्या दिवशी तुमचं लग्न झालं, ती तारीख सोडून जगातली इतर कोणतीही तारीख विसरलात तरी चालेल, पण लग्नाची तारीख कधीही विसरू नका.” ते पुढे म्हणाले, “ही खूप महत्त्वाची तारीख आहे. बायकांची एक सवय असते, त्या वारंवार विचारतात, आपलं लग्न कधी झालं होतं, आठवतंय ना?”.
याच भागात एका स्पर्धकाने अमिताभ बच्चन यांना विचारलं की, जया बच्चन ते कामावरून परतण्याची वाट पाहतात का, जेणेकरून दोघे एकत्र जेवण करू शकतील? यावर अमिताभ बच्चन यांनी सांगितलं की, ते जया यांच्यासह संपूर्ण कुटुंबाला आपल्या व्यग्र कामाच्या वेळापत्रकाची माहिती देण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे त्यानुसार कुटुंबातील सदस्यांना जेवणाचं नियोजन करता येतं.
ती माझी चांगलीच खरडपट्टी काढते – अमिताभ बच्चन
अमिताभ बच्चन यांनी सांगितलं, “मी सकाळी उठताच आमच्या कुटुंबातील सर्व सदस्यांचे नंबर सेव्ह असलेल्या एका ग्रुपवर हात जोडून नमस्कार असा मेसेज पाठवतो. त्यानंतर मी कुठेतरी शूटिंगला जाणार आहे आणि उशीर होणार असल्याचं सांगतो. त्यामुळे माझ्यासाठी जेवायला थांबू नका, असं मी त्यांना आधीच सांगतो. मी सगळ्यांना आधीच कळवतो”. ते पुढे मिश्कीलपणे म्हणाले, “पण समजा मी तिला (जया यांना) सांगितलंच नाही, तर माझी चांगलीच खरडपट्टी काढली जाते. कुठे होता? आम्हाला कळवलं का नाही? घरी यायची ही वेळ आहे का? असं विचारलं जातं. त्यामुळे मला खूप उशीर होणार असेल, तर ती जेवून घेते आणि झोपायला जाते.”
