Amitabh Bachchan and Jaya Bachchan Love story: जया बच्चन म्हणजेच तेव्हाच्या जया भादुरी यांनी फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (FTII)मध्ये शिक्षण घेत असताना पहिल्यांदा अमिताभ बच्चन यांना पाहिलं होतं. त्यानंतर हृषिकेश मुखर्जी यांच्या ‘गुड्डी’ चित्रपटाच्या सेटवर त्यांची पुन्हा भेट झाली.
“हा किती विचित्र माणूस आहे”
१९९९ मध्ये प्रकाशित झालेल्या ‘अमिताभ बच्चन : द लिजेंड’ या पुस्तकासाठी भावना सोमय्या यांच्याशी संवाद साधताना जया यांनी अमिताभ यांच्याबरोबरच्या पहिल्या भेटीचा किस्सा सांगितला होता. ‘गुड्डी’ चित्रपटाच्या सेटवर अमिताभ एकटक पाहत होते अशी आठवण त्यांनी सांगितली होती.
त्या म्हणाल्या होत्या, “मला त्यावेळी वाटलं होतं की, हा किती विचित्र माणूस आहे. एखाद्याकडे असं एकटक कसं पाहू शकतो?” मात्र, कालांतराने जया यांना समजलं की, अमिताभ नकळत अशाच पद्धतीने लोकांकडे बघायचे. आपल्या या सवयीमुळे समोरची व्यक्ती अस्वस्थ होते, याची त्यांनाही जाणीव नसायची.”
२००२ मध्ये प्रकाशित झालेल्या खालिद मोहम्मद यांच्या ‘टू बी ऑर नॉट टू बी : अमिताभ बच्चन’ या पुस्तकासाठी दिलेल्या मुलाखतीतही जया यांनी काही आठवणी सांगितल्या होत्या. अमिताभ ‘गुड्डी’ चित्रपटात काम करणार असल्याचं समजल्यावर खूप आनंद झाला होता, असं त्या म्हणाल्या होत्या. मात्र, नंतर हृषिकेश मुखर्जी यांना या चित्रपटासाठी नवीन चेहरा पाहिजे होता, त्यामुळे त्यांनी अमिताभ यांना चित्रपटातून काढलं. त्याआधी अमिताभ यांनी ‘सात हिंदुस्तानी’ या चित्रपटात काम केलं होतं.
“…तेव्हा मला त्यांची भीती वाटली होती”
सिमी गरेवाल यांना दिलेल्या मुलाखतीत जया यांनी त्यांच्या नात्याच्या सुरुवातीच्या दिवसांबद्दल सांगितलं होतं. त्या म्हणाल्या होत्या, “जेव्हा मी अमिताभ यांना पहिल्यांदा भेटले, तेव्हा मला त्यांची भीती वाटली होती.” याबद्दल स्पष्टीकरण देताना जया म्हणालेल्या, “मला भीती वाटली होती. कारण, अमिताभ ही एकमेव अशी व्यक्ती होती, जी मला एखादी गोष्ट करायला सांगू शकत होती आणि मीही त्यांचं ऐकायचे. त्यांनी अगदी सहजपणे एखादी गोष्ट सांगितली, तरी मी ती करायचे. मला त्यांना आनंदी ठेवावं असं वाटायचं. खरंतर इतरांना आनंदी करण्यासाठी काहीतरी करणं हा माझा स्वभावच नाही. पण अमिताभ यांच्या बाबतीत मात्र असं घडायचं.”
भावना सोमय्या यांच्याशी बोलताना जया म्हणाल्या होत्या, “माझ्याबरोबर वेळ घालवायला त्यांना आवडतं, हे मला स्पष्टपणे जाणवत होतं. पण त्यापलीकडे त्यांच्या मनात माझ्याबद्दल नेमक्या काय भावना आहेत,याबद्दल मला काहीच कल्पना नव्हती. ते इतके सभ्य आणि अबोल होते की, त्यांनी कधीच मला उघडपणे काही विचारलं नाही किंवा सांगितलं नाही.”
अमिताभ बच्चन जरी बोलून प्रेम व्यक्त करत नसले तरी त्यांच्या कृतीतून ते जाणवत होतं, असंही त्या म्हणाल्या. एक आठवण सांगत त्या म्हणालेल्या की अमिताभ बच्चन यांनी माझ्या FTIIमधील पदवीदान कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी मुंबईहून पुण्यापर्यंत तब्बल पाच तास गाडी चालवली होती. त्यांच्या त्या वागण्याने मी भारावून गेले होते.
या काळात अमिताभ जया यांना अनेकदा कांजीवरम साड्या भेट द्यायचे. कारण, जया यांना या साड्या खूप छान दिसतात, असं त्यांना वाटायचं. याबद्दल खालिद मोहम्मद यांच्याशी बोलताना जया म्हणाल्या होत्या, “गंमत म्हणजे त्यांनी मला भेट दिलेल्या बहुतांश साड्या पांढऱ्या रंगाच्या असायच्या. त्याला जांभळा काठ असायचा. खरंतर जांभळा रंग मला अजिबात शोभत नाही.” पुढे १९७३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘अभिमान’ चित्रपटात जया यांनी यापैकी काही साड्या नेसल्या होत्या.
“त्यांनी मला कधीही लग्नासाठी मागणी घातली नाही”
१९७२ मध्ये ‘एक नजर’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्यांच्या नात्याला महत्त्वाचं वळण मिळालं. पुण्यात असताना दोघांमध्ये मोठं भांडण झालं होतं. मात्र, हे भांडण मिटल्यानंतर त्यांचं नातं अधिक घट्ट झाल्याची जाणीव जया यांना झाली.
त्या दिवसांच्या आठवणी सांगताना जया म्हणाल्या होत्या, “त्या काळात अमिताभ मला नेहमी एक गोष्ट विचारायचे, ‘मला तुझी काळजी वाटते, तुलाही माझी काळजी वाटते का?’ पण ते हे सगळं नेहमी गंमतीने, अगदी सहज बोलून जायचे. त्यांनी कधीच गंभीरपणे आपल्या भावना व्यक्त केल्या नाहीत. इतकंच नाही, तर त्यांनी मला कधीही लग्नासाठी मागणी घातली नाही. अगदी शेवटपर्यंत त्यांच्या मनात माझ्याबद्दल नेमक्या काय भावना आहेत याबद्दल मला शंका होती.”
जया आणि अमिताभ यांनी इतर जोडप्यांप्रमाणे कधी डेटिंग केलं नाही. मात्र, आपण एकमेकांच्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग आहोत, याची दोघांनाही जाणीव होती. जया यांच्या मते, अमिताभ यांच्यासारख्या व्यक्तीबरोबर प्रेमसंबंधात राहणं सोपं नव्हतं. कारण, ते स्वभावाने अंतर्मुख आणि अत्यंत संवेदनशील होते. मात्र, तोपर्यंत जया त्यांना चांगल्याप्रकारे ओळखू लागल्या होत्या. त्यामुळे त्यांनी अमिताभ यांचा स्वभाव समजून घेतला.
“तुला घर खरेदी करण्याची काय गरज आहे?”
त्यांच्या नात्यात लग्नाचा विषय अनेकदा निघाला होता. मात्र, त्यावर कधीही गांभीर्याने चर्चा झाली नव्हती. त्यावेळी जया मुंबईत आपल्या काही नातेवाइकांबरोबर राहत होत्या. काही यशस्वी चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर त्यांनी स्वतःसाठी घर खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. घर पाहण्यासाठी अमिताभही त्यांच्याबरोबर जायचे. मात्र, जया यांनी पाहिलेल्या अनेक घरांमध्ये अमिताभ काही ना काही त्रुटी काढायचे. जया यांना स्वतःसाठी वेगळं घर कशाला हवं आहे, असा प्रश्नही त्यांना पडायचा.
ते अनेकदा जया यांना विचारायचे, “तुला घर खरेदी करण्याची काय गरज आहे? तुला माझ्याशी लग्न करायचं नाहीये का?” मात्र, अमिताभ जुन्या विचारांचे असल्यामुळे ते हे सगळं गंमतीने बोलत असावेत, असं जया यांना वाटायचं.
या काळात दोघांच्याही करिअरची वाटचाल वेगवेगळ्या दिशेने सुरू होती. जया स्टार बनल्या होत्या. दुसरीकडे अमिताभ यांचे चित्रपट मात्र एकामागोमाग एक अपयशी ठरत होते. अशातच अमिताभ यांना ‘जंजीर’ चित्रपटाची ऑफर मिळाली. मात्र, या चित्रपटात अभिनेत्रीच्या भूमिकेला फारसा वाव नसल्यामुळे अनेक अभिनेत्रींनी काम करण्यास नकार दिला होता. अखेर जया यांनी या चित्रपटात काम करण्यास होकार दिला.
‘अँग्री यंग मॅन’ या डॉक्युमेंटरीमध्ये जया यांनी जंजीर सिनेमात काम करण्याबद्दल वक्तव्य केलं होतं. त्या म्हणाल्या होत्या, “सलीम-जावेद अगदी स्पष्ट बोलणारे होते. त्यांनी अनेक अभिनेत्रींना या चित्रपटासाठी विचारलं होतं. पण सगळ्यांनीच नकार दिला. त्यानंतर ते माझ्याकडे आले आणि म्हणाले की तू या चित्रपटाला नकार देऊ शकत नाहीस. आम्हाला तुझी गरज आहे. अर्थातच, हा चित्रपट स्वीकारण्यामागे माझा सहकलाकार हेही एक कारण होतं. त्यामुळे निदान आम्हाला एकत्र वेळ तरी घालवता येईल, असा विचार करून मी होकार दिला.”
“योग्य लोकांबरोबर…”
‘जंजीर’ चित्रपटाने अमिताभ बच्चन यांच्या करिअरला वेगळी दिशा मिळाली. या चित्रपटाच्या यशानंतर काही काळातच जया आणि अमिताभ यांनी लग्नगाठ बांधली. खरंतर ‘जंजीर’ यशस्वी झाल्यानंतर दोघांनी आपल्या मित्रमंडळींबरोबर लंडनला फिरायला जायचं ठरवलं होतं. मात्र, ही गोष्ट त्यांच्या कुटुंबीयांना समजताच त्यांनी लग्नाआधी एकत्र परदेशात जाण्यास विरोध केला. आधी लग्न करा आणि मग लंडनला जा, अशी अट कुटुंबीयांनी घातली. त्यामुळे अवघ्या काही दिवसांतच जया आणि अमिताभ यांनी लग्न केलं. मात्र, या लग्नाबरोबरच आणखी एक अट होती आणि ती जया यांनी आनंदाने स्वीकारली होती.
जया बच्चन यांनी नात नव्या नवेली नंदा हिच्या ‘व्हॉट द हेल नव्या’ या पॉडकास्टमध्ये लग्नापूर्वीचा एक किस्सा सांगितला होता. त्या म्हणाल्या होत्या, “आम्ही ऑक्टोबरमध्ये लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. कारण, तोपर्यंत माझं काम कमी झालेलं असेल, असं आम्हाला वाटत होतं. मात्र, अमिताभ यांनी मला आधीच सांगितलं होतं की मला सकाळी ९ ते संध्याकाळी ५ या वेळेत रोज काम करणारी पत्नी नको आहे. तू काम कर, पण दररोज नाही. तुला कोणत्या प्रोजेक्टमध्ये काम करायचं आहे, हे तू स्वतः ठरव आणि योग्य लोकांबरोबर काम कर.”
भावना सोमय्या यांच्याशी बोलताना जया यांनी त्यांच्या वैवाहिक आयुष्याबद्दल भाष्य केलं होतं. त्या म्हणाल्या होत्या, “सुपरस्टारबरोबर लग्न केल्यानंतर वैवाहिक आयुष्य सांभाळणं कठीण असतं का? असा प्रश्न मला अनेकदा विचारला जातो. खरंतर दोन संवेदनशील आणि सर्जनशील व्यक्ती एकत्र आल्यावर त्यांच्यात मतभेद निर्माण होण्याची शक्यता अधिक असते.”
याच मुलाखतीत जया यांनी त्यांचं वैवाहिक नातं टिकवून ठेवण्यामागचं एक सिक्रेटही सांगितलं होतं. त्या म्हणाल्या होत्या, “अमिताभ यांच्याशी नेमकं कधी बोलायचं आणि कधी शांत राहायचं, हे मला चांगलंच माहीत आहे.”
दरम्यान, अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांना श्वेता व अभिषेक ही दोन मुलं आहेत.
