बॉलीवूडला अमिताभ बच्चन यांच्या भूमिकांतून अँग्री यंग मॅन मिळाला. अमिताभ बच्चन यांचे मिस्टर नटवरलाल, अंधा कानून, ‘दो और दो पाँच’, ‘सुहाग’, क्रोध, मृत्युदाता, शोले, जंजीर, कुली असे अनेक चित्रपट गाजले. अमिताभ बच्चन यांच्या भूमिका तर गाजल्याच; पण त्याबरोबरच त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल चर्चा झाली. जया यांच्याबरोबर लग्न, रेखा यांच्याबरोबर रिलेशनमध्ये असल्याच्या चर्चा, दिवाळखोरी यांबरोबरच राजकारणातील एन्ट्री आणि राजीनामा अशा अनेक कारणांमुळे ते सतत चर्चेत होते.
एका मुलाखतीत त्यांनी त्यांच्या व्यसनाबद्दल वक्तव्य केले होते. ते नेमकं काय म्हणाले होते, हे जाणून घेऊ…
अमिताभ बच्चन यांनी केलेला व्यसनाबद्दल खुलासा
१९८० मध्ये ‘इंडिया टुडे’ला दिलेल्या मुलाखतीत अमिताभ बच्चन यांनी त्यांना आधी कोणत्या सवयी होत्या, याबद्दल सांगितले होते. ते खूप जास्त प्रमाणात धूम्रपान करीत होते, तसेच मोठ्या प्रमाणात दारू प्यायचे, तसेच मांसाहार करायचे असा खुलासा त्यांनी केला.
ते म्हणाले होते, “मी आता धूम्रपान करत नाही. दारू पीत नाही. तसेच, मांसाहारही करत नाही. हा निर्णय धार्मिक कारणांमुळे घेतलेला नाही; पण हा चवीचा प्रश्न आहे. याआधी मी मांसाहार, मद्यपान आणि धूम्रपान करत असते; पण मी ते सगळे सोडले.”
अमिताभ बच्चन यांनी खुलासा केला होता की, त्यांच्या कुटुंबात सर्व जण वेगवेगळा आहार घेतात. आई तेजी आणि पत्नी जया बच्चन दोघीही मांसाहार करतात; तर वडील हरिवंशराय बच्चन हे कायम आयुष्यभर शाकाहारी राहिले. पण, कोणी कोणता आहार करावा, यावरून घरात कधी वाद झाले नाहीत.
अमिताभ बच्चन यांनी मुंबईत आल्यानंतर घेतलेला मोठा निर्णय
अमिताभ बच्चन याच मुलाखतीत असे म्हणालेले, “मी कलकत्त्याला असताना एका दिवशी २०० सिगारेट ओढायचो; पण मुंबईत आल्यावर मी सिगारेट ओढणे सोडले. मी प्रचंड दारूही प्यायचो. पण, काही वर्षांपूर्वी जाणीव झाली की, इतकी दारू पिण्याची काही गरज नाही. या सवयींचा आता माझ्यावर काही परिणाम होत नाही. आता मी ते सगळे सोडले आहे. फक्त परदेशात शूटिंग करताना मात्र शाकाहारी अन्न मिळवणे थोडे कठीण जाते.”
त्याबरोबरच त्यांनी त्यांच्या स्वभावाबद्दलही सांगितले होते. ते म्हणालेले की, मी मुळातच शांत स्वभावाचा आहे. मात्र, तरुण असताना मला पटकन राग येत असे; पण माझा स्वभाव हिंसक नाही.
दरम्यान, अमिताभ बच्चन यांच्या कामाबद्दल बोलायचे, तर ते लवकरच ‘कल्की २’मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.
