Know how Amitabh Bachchans parents welcomed Jaya: अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्या लग्नाला ५२ वर्षे पूर्ण झाली आहेत. जेव्हा त्यांनी लग्नगाठ बांधली, त्यावेळी जया बच्चन लोकप्रिय अभिनेत्री होत्या. त्यांनी अनेक उत्तमोत्तम चित्रपटांत काम केले.

अमिताभ बच्चनदेखील विविध भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर राज्य करीत होते. मात्र, या कलाकारांनी अत्यंत साधेपणाने आणि कमी लोकांच्या उपस्थितीत लग्नगाठ बांधली. लग्नानंतर जया बच्चन यांनी कमी चित्रपटांत काम केले. काही मोजक्याच भूमिका त्यांनी साकारल्या.

मुलीच्या जन्मानंतर तर त्या फार कमी प्रमाणात चित्रपटांत दिसल्या. जया बच्चन यांनी त्यानंतर अनेकदा असे सांगितले की, त्यांनी स्वत:च्या इच्छेने काम करणे थांबविले. दरम्यानच्या कालावधीत अमिताभ बच्चन यांची लोकप्रियता यशाच्या शिखरावर पोहोचली होती. अँग्री यंग मॅन ही ओळख त्यांना मिळाली होती.

Award Banner

“इंदिरा गांधींनी लग्नाला उपस्थित…”

अमिताभ बच्चन यांचे वडील हरिवंशराय बच्चन हे भारतातील प्रसिद्ध लेखक व कवी होते. त्यांनी त्यांच्या ‘दशद्वार से सोपान तक’ या आत्मचरित्रात जया आणि अमिताभ बच्चन यांच्या लग्नानंतरच्या काळाबद्दल लिहिले आहे. त्यांनी लिहिले की, लग्नानंतर काही दिवस जया शूटिंगसाठी जात असे. पण, मला तिचे शूटिंगला जाणे आवडत नसे. कारण- घरात कमावणारे तीन पुरुष होते, ते खर्च भागवू शकत होते.

हरिवंशराय बच्चन यांनी असेही लिहिले की, लग्नाची तारीख ठरली, तेव्हा कमी लोकांच्या उपस्थितीत लग्न करण्याचे ठरले. त्यांच्या पत्नी तेजी यांनी इंदिरा गांधींना आमंत्रण दिले. कारण- त्यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध होते. पण, इंदिरा गांधींनी लग्नाला उपस्थित राहणे शक्य नसल्याचे सांगितले. तसेच, त्यांच्या वतीने संजय गांधी लग्नाला येतील, असेही सांगितले. खरे तर इंदिरा गांधी लग्नाला हजर राहिल्या असत्या, तर ते लग्न गुपित राहिले नसते, असेही हरिवंशराय यांनी लिहिले.

लग्नाआधीच्या कन्यापूजा या विधीसाठी गेल्यानंतर जया वगळता इतर कोणाच्याही चेहऱ्यावर आनंद दिसला नाही, असेही हरिवंशराय यांनी लिहिले.

“माझे तर घर उद्ध्वस्त झाले”

लग्नानंतर जेव्हा हरिवंशराय यांनी जया यांच्या वडिलांची गळाभेट घेतली आणि ते अभिनंदन करीत म्हणाले की, अमिताभसारखा जावई तुम्हाला मिळाला आहे, अभिनंदन! त्यानंतर जया यांचे वडील जे म्हणाले, ते ऐकून धक्का बसला होता, असे हरिवंशराय यांनी लिहिले. त्यांनी लिहिले की, मी आशा करीत होतो, तेही म्हणतील की, तुम्हालाही जया सून म्हणून मिळाली, अभिनंदन! पण, ते म्हणाले की, माझे तर घर उद्ध्वस्त झाले.

जया बच्चन यांचे असे झालेले स्वागत

तसेच हरिवंशराय यांनी सुनेचे स्वागत करताना त्यांच्या घराची परंपरा काय होती, त्याबद्दलदेखील लिहिले. लग्नानंतर सून जेव्हा पहिल्यांदा घरी येते, त्यावेळी सासू तिच्या पाया पडते आणि तिला सांगते की, देवी आशीर्वाद देण्यासाठी आली आहे, असा या घरात प्रवेश कर. त्यावर सून म्हणते की मी, देवी, या घरात पाऊल ठेवते. मी मेण्यातून आले आहे, चितेवर निघून जाईन. या एकाच वेळी सासू सुनेच्या पाया पडते, त्यानंतर सून सासूच्या पाया पडते.

हरिवंशराय यांनी लिहिले की, जेव्हा माझे आणि तेजीचे लग्न झाले होते. त्यावेळी मी ते शब्द म्हणू दिले नव्हते. त्यामुळे जयानेदेखील त्या म्हणू नयेत, असे आम्ही ठरवले. मी आणि तेजीने ठरवले की, आपण जयाच्या पायांना स्पर्श करून, तिचे स्वागत करू. आम्ही जयाला ते शब्द म्हणायला सांगितले नाहीत.

“घरात तीन कमावते पुरुष…”

हरिवंशराय यांनी असेही लिहिले की, लग्नाच्या चार दिवसांनंतर जया आणि अमिताभ बच्चन इंग्लंडला हनिमूनसाठी जाणार होते. पण, त्याआधी जया तिच्या चित्रपटासाठी शूटिंगसाठी जाणार होती. मी तिला म्हणालो की, घरात तीन कमावते पुरुष आहेत आणि तरीही नवीन लग्न झालेली नवरी कामासाठी जात आहे. मला हे अजिबात आवडले नाही; पण जयाने आधीच शब्द दिल्याने ती शूटिंगसाठी गेली.

जया बच्चन यांनी ‘व्हॉट द हेल विथ नव्या’ या पॉडकास्टमध्ये एकदा यावर वक्तव्य केले होते. लग्नानंतर त्या काम करू शकतात की नाही, याबद्दल अमिताभ यांनी लग्नाआधी त्यांना काय सांगितले होते, याचा खुलासा केला होता. त्या म्हणालेल्या, “मला अमिताभ यांनी सांगितले होते की, मला ९ ते ५ काम करणारी पत्नी नको. तुम्ही काम करा; पण निवडक काम करा. चांगल्या लोकांबरोबर काम करा.”

अमिताभ बच्चन यांनी अनेकदा कामापेक्षा कुटुंबाला प्राधान्य दिले, याबद्दल जया यांना श्रेय दिले आणि त्यांचे कौतुक केले.

दरम्यान, जया यांनी चित्रपटात भूमिका साकारणे कमी केले असले तरी त्या कॅमेऱ्यापासून कधीच दूर गेल्या नाहीत. २०२३ मध्ये प्रदर्शित झालेल्या रॉकी और रानी की प्रेम कहाणी या चित्रपटात त्या महत्त्वाच्या भूमिकेत दिसल्या होत्या.