चित्रपटसृष्टीतील स्टार किड्सच्या प्रोजेक्ट्सबद्दल प्रेक्षक नेहमीच उत्सुक असतात. खरं तर, लोक सुपरस्टार्सच्या मुलांच्या अभिनयात त्यांच्या आई-वडिलांची प्रतिभा शोधत असतात. आपल्या आई-वडिलांप्रमाणे तेही प्रभावी काम करतील, असं एक साधारण मत त्यांच्याबद्दलचं असतं. पण सर्वच स्टारकिड्स त्यांच्या आई-वडिलांइतकं चांगलं काम करून यशस्वी हऊ शकत नाही.
बॉलीवूडमध्ये स्टारकिड्स आणि नेपोटिझम हे विषय नेहमीच चर्चेत असतात. आई किंवा वडील अथवा दोन्ही पालक फिल्म इंडस्ट्रीत असल्याने स्टारकिड्सना काम सहज मिळतं. संधीही सहज उपलब्ध होतात. असं आउटसायडर्सच्या बाबतीत नसतं. त्यांना प्रतिभावान असूनही काम मिळवण्यासाठी खूप संघर्ष करावा लागतो. आज आम्ही तुम्हाला ३ बॉलीवूड स्टार्सच्या मुलांबद्दल सांगणार आहोत, ज्यांना आपल्या वडिलांइतकं यश मिळू शकलं नाही. कालांतराने हे स्टार्स फिल्म इंडस्ट्रीपासून दुरावले, तर काहींनी अभिनय सोडून इतर पर्याय निवडले.
अमजद खानच्या मुलाचं करिअर
‘शोले’ चित्रपटातील गब्बर या भूमिकेतून लोकप्रियता मिळवणारे अमजद खान यांच्या कामाचे नेहमी कौतुक व्हायचे. त्यांनी करिअरमध्ये अनेक दमदार भूमिका साकारल्या. त्यांचा मुलगा शादाब खानने १९९७ मध्ये ‘राजा की आएगी बारात’ या चित्रपटातून पदार्पण केलं होतं. पण मोठ्या पडद्यावर पदार्पण केल्यानंतर, तो त्याच्या वडिलांइतकं चांगलं काम करू शकला नाही. त्यानंतर तो अभिनयापासून दूर गेला आणि आता लेखक म्हणून काम करतो.
देव आनंद यांचा मुलगा सुनील आनंदही ठरला फ्लॉप
बॉलीवूड सुपरस्टार देव आनंद यांनी अनेक सुपरहिट चित्रपट दिले आणि प्रेक्षकांचे मनोरंजन केले. त्यांनी त्यांचा मुलगा सुनील आनंदला घेऊन ‘आनंद ही आनंद’ नावाचा चित्रपट बनवला होता. त्याचं दिग्दर्शन त्यांनी स्वतः केलं होतं. पण हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला. आणि नंतर सुनील आनंदने फारसे चित्रपट केले नाही.
राज कपूर यांनी धाकट्या मुलाला संधी दिली, पण…
बॉलीवूडचे ‘शोमन’ अशी ओळख असलेले राज कपूर यांनी त्यांचा धाकटा मुलगा राजीव कपूर यांनाही अभिनयात संधी दिली होती. राजीव यांना ‘राम तेरी गंगा मैली’ या चित्रपटातून लाँच करण्यात आलं. हा चित्रपट हिट झाला, पण त्याचं सर्व श्रेय मंदाकिनीला गेलं. त्यानंतर राजीव कपूर यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले, परंतु त्यांना वडील किंवा भावांइतकं यश मिळू शकलं नाही. राजीव कपूर यांचं २०२१ मध्ये निधन झालं.

