Riteish Deshmukh’s sons Riaan and Rahyl to debut in Raja Shivaji movie : रितेश देशमुख सध्या त्याच्या ‘राजा शिवाजी’ या आगामी ऐतिहासिक चित्रपटामुळे चर्चेत आहे. मराठी व हिंदी इंडस्ट्रीतील अनेक लोकप्रिय कलाकार यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. महत्त्वाचं म्हणजे रितेश व जिनिलीया यांच्याबरोबर यामधून त्यांची मुलंसुद्धा झळकणार आहेत.

अलीकडेच ‘राजा शिवाजी’ या चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा पार पडला. यावेळी चित्रपटातील कलाकारांसह गायक संगीतकार अजय अतुल व निर्मात्या ज्योती देशपांडे यांनीसुद्धा हजेरी लावली होती. येत्या १ मे रोजी हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. समोर आलेल्या ट्रेलरमध्ये रितेश देशमुख व जिनिलीया यांच्यासह त्यांचा धाकटा मुलगा राहिल देशमुखचीसुद्धा झलक पाहायला मिळाली. राहिल यामध्ये बाल शिवाजी महाराजांच्या भूमिकेत पाहायला मिळतोय. 

‘राजा शिवाजी’मध्ये रितेश देशमुखची दोन्ही मुलं झळकणार

‘राजा शिवाजी’ चित्रपटात फक्त राहिल देशमुख नाही तर रितेशचा मोठा मुलगा रियानसुद्धा झळकणार आहे. ‘कमिने’ आणि ‘सिंघम रिटर्न्स’सारख्या चित्रपटांमध्ये खलनायकाच्या भूमिका साकारण्यासाठी ओळखले जाणारे अमोल गुप्ते यांनी ‘व्हरायटी इंडिया’शी संवाद साधताना  रितेश आणि जिनिलिया यांच्या मुलांना प्रशिक्षण दिल्याचं म्हटलं आहे. त्यांचा मोठा मुलगा रियान जो अकरा वर्षांचा आहे आणि धाकटा मुलगा राहिल नऊ वर्षांचा आहे यांना त्यांना अभिनयाचे धडे दिले. आता हे दोघे ‘राजा शिवाजी’ या चित्रपटातून पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर झळकणार आहेत. यानिमित्ताने अमोल गुप्तेंनी रियान आणि राहिलविषयी सांगितलं आहे.

रितेशच्या मुलांना ‘गणपती स्तोत्र’ आणि अनेक आरत्या तोंडपाठ आहेत

अमोल गुप्ते म्हणाले, “रितेश देशमुख आणि जिनिलिया माझे मित्र-मैत्रीण आहेत. माझ्या ‘स्टॅन्ली का डब्बा’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ते पुढे होते.” पुढे तो म्हणाले, “त्यांच्या या दोन कमालीच्या मुलांबरोबर वेळ घालवणं माझ्यासाठी खूप आनंददायी होतं. एवढ्या लहान वयात त्यांना ‘गणपती स्तोत्र’ आणि अनेक आरत्या तोंडपाठ आहेत, यावर विश्वास बसणार नाही. ‘राजा शिवाजी’ चित्रपटात हे दोघे वेगवेगळ्या वयातील छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहेत. ट्रेलरमध्ये दिसणाऱ्या बाल शिवरायांच्या भूमिकेत लहान राहिल दिसणार आहे, तर थोड्या मोठ्या वयातील शिवाजी महाराजांच्या भूमिकेत रियान झळकणार आहे.”

अमोल गुप्ते पुढे म्हणाले, “मी फक्त त्या दोघांबरोबर मजेत वेळ घालवला आणि आता ते माझे चांगले मित्र झाले आहेत. आम्ही त्यांच्या मराठी संवादांवर एकत्र काम करायचो. त्यांच्या स्क्रिप्टमधील काही भाग मला दिला होता आणि त्यांनी कसं बोलायला हवं याबद्दल मी त्यांना काही टिप्स दिल्या. ते खूप पटकन शिकले. त्यामुळे प्रत्येक शनिवारी त्यांना भेटण्यासाठी मी आतुरतेने वाट पाहायचो.”