बॉलीवूड अभिनेता गोविंदाच्या सेटवर उशीरा जाण्याबद्दलच्या अनेक बातम्या आजही चर्चेत असतात. त्याच्याबरोबर काम केलेले कलाकार व दिग्दर्शकांनी याबद्दही प्रतिक्रियाही दिली आहे. त्याच्यामुळे अनेकदा शूटिंगसाठी उशीर व्हायचा अशा चर्चा अनेकदा ऐकायला मिळतात. एकदा तर उशिरा आल्याने दिवंगत अभिनेते अमरीश पुरी यांनी त्याच्या कानशिलात लगावली होती असंही म्हटलं जातं.
अमरीश पुरी यांनी शूटिंगसाठी तब्बल नऊ तास उशिरा पोहोचल्यामुळे अभिनेता गोविंदाला कानाखाली मारल्याचा किस्सा अनेक वर्षांपासून चर्चेत आहे. मात्र, आता अमरीश पुरी यांचा मुलगा राजीव पुरीने याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. त्याच्या वडिलांनी कोणालाही कधी कानशिलात लगावली असेल यावर त्याचा विश्वास नसल्याचं त्याने म्हटलं आहे.
नेमकं काय घडलेलं?
राजीव पुरीने विकी ललवानीला दिलेल्या मुलाखतीत याबद्दल भाष्य केलं आहे. यावेळी त्याला ‘दो कैदी’ चित्रपटाशी जोडल्या जाणाऱ्या या प्रसंगाबद्दल विचारण्यात आलं. माध्यमांच्या माहितीनुसार, अमरीश पुरी सकाळी ९ वाजताच्या शूटिंगसाठी सेटवर पोहोचले होते, तर गोविंदा संध्याकाळी ६ वाजता सेटवर आला. गोविंदामुळे झालेल्या विलंबामुळे दोघांमध्ये जोरदार वाद झाला आणि अमरीश पुरी यांनी संपूर्ण क्रूच्या समोर गोविंदाला कानाखाली मारली, असं म्हटलं जातं. मात्र राजीवने त्याच्या वडिलांचा स्वभाव पाहता त्यांनी असं काही केलं असेल असं वाटत नाही असं म्हटलं आहे.
अमरीश पुरींच्या मुलाची प्रतिक्रिया
अमरीश पुरी यांचा मुलगा म्हणाला, “मला वाटत नाही की हे खरं आहे. त्यांचा रागावरचा ताबा कधीच सुटायचा नाही. ते अशा पद्धतीने कधीही रागावायचे नाहीत. एखाद्या व्यक्तीने त्यांना दोन-तीन वेळा त्रास दिल्यानंतरच ते आवाज चढवायचे. पण त्यानंतरही त्यांनी कोणाला कानाखाली मारली असेल, असं मला वाटत नाही. हे खरं नाही. मीही याबद्दल ऐकलं आणि वाचलं आहे. पण माझ्यासाठी या गोष्टीला फारसं महत्त्व नाही, कारण मला माहीत आहे की, बाबा असं कधीच काही करणार नाहीत.”
गोविंदाने अमरीश पुरींसह पुन्हा काम का केलं नाही?
मात्र, गोविंदाच्या उशिरा येण्याच्या सवयीचा अमरीश पुरींबरोबरच्या त्याच्या भविष्यातील कामावर परिणाम झाला असावा, असा अंदाज राजीव पुरीने व्यक्त केला. त्याच्या वडिलांना अशा प्रकारे उशिरा येणं पसंत नसावं, याची जाणीव कदाचित गोविंदाला झाली असावी, असं त्याने सांगितलं आहे. राजीव पुरी म्हणाला, “कदाचित याच कारणामुळे गोविंदाने भविष्यात वडिलांबरोबर काम केलं नसेल. उशिरा येण्याच्या सवयीमुळे त्यांच्याबरोबर जमणार नाही हे कदाचित त्याच्या लक्षात आलं असेल आणि म्हणूनच त्याने पुन्हा त्यांच्यासह काम केलं नसेल. पण अशा गोष्टींचा बाबांनी कधी मनात राग धरला असेल, असं मला वाटत नाही.”
अमरीश पुरी आणि गोविंदाने १९८९ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘दो कैदी’ या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. हा चित्रपट दोघांचा शेवटचा एकत्रित काम केलेला चित्रपट असल्याचं सांगितलं जातं. मात्र, त्यानंतर दोघांनी पुन्हा एकत्र काम का केलं नाही, याबाबत गेल्या अनेक वर्षांत वेगवेगळ्या चर्चा रंगल्याचं पाहायला मिळालं आहे.
