Actress Amruta Subhash & Jyoti Subhash : मराठीसह हिंदी कलाविश्वात आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजेच अमृता सुभाष. आजवर तिने असंख्य गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केलेलं आहे. याशिवाय बॉलीवूडमध्येही अमृताने प्रत्येकाला लक्षात राहतील अशा निर्णायक भूमिका साकारल्या आहेत. अमृता सुभाष ही ज्येष्ठ आणि दिग्गज अभिनेत्री ज्योती सुभाष यांची कन्या आहे.
या मायलेकींनी ‘गली बॉय’ सिनेमात एकत्र काम केलं होतं. या मायलेकींनी रुपेरी पडद्यावर सासू-सुनेची ( रझिया अहमद व मुरादची दादी ) भूमिका साकारली होती. पण, आजही ज्योती सुभाष या अमृताच्या आई आहेत…ही गोष्ट अनेकांना माहिती नाहीये. याबद्दलचा एक खास किस्सा अमृताने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितला.
अमृता सुभाष ममाराझीशी संवाद साधताना सांगते, “अनेकांनी अजूनही माहिती नाहीये. माझी आई सुद्धा प्रसिद्ध अभिनेत्री असून जिचं नाव आहे ज्योती सुभाष. ‘गली बॉय’मध्ये आईने माझ्या ऑनस्क्रीन सासूची भूमिका साकारली होती. त्यामागचा एक मजेशीर किस्सा मी तुम्हाला सांगते.”
अभिनेत्री पुढे म्हणाली, “मी ‘बॉम्बे बेगम्स’ या सीरिजमध्ये पूजा भट्टबरोबर काम केलं होतं. त्यावेळी आम्ही दोघीही पहिल्यांदाच एकमेकींना भेटलो होतो. तेव्हा ती मला म्हणाली, ‘भाई…’गली बॉय’मध्ये तुझ्या सासूची भूमिका कोणी साकारली होती? त्या अभिनेत्री एकदम जबरदस्त आहेत.’ मला तेव्हा वाटलं, पूजाला माहिती असणार की…ती माझीच आई आहे आणि त्यामुळे मुद्दाम चेष्ठा करण्यासाठी ती असं बोलत असेल. त्यानंतर ती म्हणाली, ‘नाही…नाही! खरंच मला सांग कोण आहेत त्या अभिनेत्री..किती सुंदर काम केलंय.”
“यावर मग मी तिला म्हणाले, ‘अगं ती माझी आई आहे…! ‘गली बॉय’मध्ये आईनेच माझ्या सासूची भूमिका साकारली आहे आणि हे ऐकून ती पूर्णपणे शॉक झाली. आम्हा मायलेकींचं नातं पूजा भट्टला एवढी वर्षे माहितीच नव्हतं…असं खूप जणांचं होतं.” असं अमृताने सांगितलं.
दरम्यान, आईबद्दल अमृता पुढे सांगते, “मी इतकी वर्षे आईचं काम बघत मोठी झालेय. घर सांभाळून तिने इंडस्ट्रीतही काम केलं. पण, जेव्हा ती रंगमंचावर काम करते किंवा एखादी भूमिका साकारताना आई ज्याप्रकारे पूर्णपणे ट्रान्सफॉर्म होते… मला तिचा हा गुण खूप जास्त आवडतो.”
