Amruta Subhash : मराठीसह हिंदी कलाविश्वात आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजेच अमृता सुभाष. तिला आजवर अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. ‘गली बॉय’ सिनेमातील भूमिकेसाठी अमृताला सिनेविश्वात मानाचा समजला जाणारा फिल्मफेअर पुरस्कार सुद्धा मिळाला आहे. या चित्रपटात अमृताने रणवीर सिंहच्या आईची भूमिका साकारली होती.
रणवीरकडे एक वेगळीच एनर्जी आहे, त्याच्याबरोबर काम करण्याचा अनुभव कसा होता? यावर अमृता सुभाषने भार्गवी चिरमुलेला दिलेल्या पॉडकास्टमध्ये सांगितलं आहे. अभिनेत्री म्हणाली, “तो खऱ्या आयुष्यात पूर्णपणे वेगळा आहे. जे हे मोठमोठे स्टार्स असतात, त्यांना अनेकदा बाहेरच्या जगात तसं राहावं लागतं. ‘गली बॉय’मध्ये त्याने साकारलेलं पात्रही तसं शांत आहे. त्यामुळे या चित्रपटाच्या सेटवर तो पूर्णवेळ शांत असायचा. मी ज्या रणवीरला प्रत्यक्ष पाहिलं…तो पूर्णपणे वेगळा आहे. तो भूमिकेचा व्यवस्थित अभ्यास करतो, अगदी त्याचप्रमाणे त्याचा सेटवर वावर असायचा.”
अमृता पुढे म्हणाली, “रणवीर आणि मी सेटवर अनेकदा विविध गोष्टींवर चर्चा करायचो. त्याने मला विचारलं होतं, तुम्ही ‘रमन राघव’मधल्या भूमिकेसाठी कशी तयारी केली? भूमिकेपर्यंत पोहोचण्याची तुमची पद्धत नेमकी कशी असते? असे अनेक प्रश्न त्याने मला विचारले होते. मग, आम्ही दोघांनी चर्चा केली. पुढे, आमच्यात त्याने ‘पद्मावत’ सिनेमात साकारलेल्या निगेटिव्ह खिलजीच्या भूमिकेविषयी चर्चा झाली. आमच्या चर्चा अशा वेगवेगळ्या विषयांवर व्हायच्या.”
“गली बॉयमध्ये माझ्या धाकट्या मुलाची भूमिका स्वर कांबळेने साकारली होती. तो नेहमी रणवीरला सांगायचा, ‘मला मोठं होऊन रणवीरसारखं व्हायचंय’…. त्यावेळी रणवीर त्याच्याशी फार प्रेमाने डील करायचा, आणि ‘तुला माझ्यासारखं व्हायचं असेल, तर थिएटर कर’ वगैरे असे फार चांगले सल्ले त्याला द्यायचा. रणवीरने स्वरचा कोणताही प्रश्न डावलला नाही…त्याला खूप मोटिव्हेट केलं, रणवीरचा हा स्वभाव मला खूप जास्त भावला.” असं अमृताने सांगितलं.
रणवीरने दिला ‘हा’ सल्ला
“रणवीरकडून मला सेटवर एक महत्त्वाची गोष्ट शिकायला मिळाली ती म्हणजे, तुमची एनर्जी तुम्ही योग्य ठिकाणी वापरली पाहिजे. तेव्हा रणवीर रात्री जाहिरातीचं शूट करून, सकाळी ‘गली बॉय’च्या सेटवर हजर असायचा. एकदा सीन करून मी प्रचंड थकले. त्यावेळी मी सारखं म्हणत होते, मी दमले…मी दमले! तेव्हा रणवीर माझ्याजवळ आला आणि म्हणाला, ‘तुम्ही अजिबात थकलेल्या नाही आहात… हे सगळं तुमच्या डोक्यात आहे. तुम्ही मनात सकारात्मक विचार करा…मग अजिबात थकणार नाही…’ त्याने सांगितलेली ही गोष्ट मी कधीच विसरणार नाही.” असं सांगत अमृताने रणवीर सिंहचं कौतुक केलं.
