मुकेश अंबानींचे धाकटे सुपूत्र अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट यांच्या प्री-वेडिंग कार्यक्रमाची जय्यत तयारी गुजरातमधील जामनगर येथे सुरू आहे. १ मार्च ते ३ मार्चदरम्यान विविध कार्यक्रम जामनगरमध्ये पार पडणार आहेत. या सोहळ्यासाठी जगभरातील कलाकारांना आमंत्रण देण्यात आलं असून बॉलीवूडमधील अनेक कलाकार मंडळी जामनगरच्या दिशेने निघाली आहेत.

हेही वाचा… पूजा सावंतच्या लग्नात सुखदा खांडकेकरच्या नखांची चर्चा; अभिनेत्रीकडून फोटो शेअर; म्हणाली, “आज या…”

एकापाठोपाठ एक असे अनेक कलाकार जामनगर विमानतळावर दिसत आहेत. पाहुण्यांना विमानतळावरून आणण्यासाठी अंबानी कुटुंबाने विशेष सुविधा केली आहे. प्रत्येक कलाकारासाठी वेगवेगळी कार पाठवून त्यांचे स्वागत केले जात आहे. बीएमडब्ल्यू, रेंज रॉवर, रोल्स रॉईससारख्या अनेक कार पाठवून पाहुण्यांना हॉटेलमध्ये नेण्यात येत आहे. पाहुण्यांचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहेत.

कारमधून रणबीर कपूर, आलिया भट्ट, राहा, नीतू कपूर यांनी जामनगरमध्ये एन्ट्री केली. तर शाहरुख खान आणि त्याचं कुटुंबसुद्धा जामनगरला पोहोचलं आहे. तसेच डिझायनर मनीष मल्होत्राही प्री-वेडिंग कार्यक्रमासाठी पोहोचला आहे. या सोहळ्यासाठी अंबानी कुटुंबाने मनीष मल्होत्राने डिझाइन केलेल्या कपड्यांची निवड केलेलं दिसत आहे. भाईजान सलमान खान, अमिताभ बच्चन, अर्जून कपूर, मानुषी छिल्लर, जान्हवी कपूर असे अनेक कलाकार जामनगरला पोहोचले आहेत.

दरम्यान, अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंटचा हा प्री-वेडिंग सोहळा भव्य होणार असून जगभरातील अनेक मंडळींना निमंत्रण देण्यात आले आहे. जगप्रसिद्ध गायिका रिहाना व तिची टीमसुद्धा जामनगरला आली आहे. तीन दिवसांच्या प्री-वेडिंग कार्यक्रमामध्ये रिहानासह, अरिजित सिंह, दिलजीत दोसांझ, बी प्राक, प्रीतम, हरिहरन आणि अजय-अतुल यांचे परफॉर्मन्स देखील होणार आहेत.