Ranbir Kapoor Ramayan Teaser Alia Bhatt Reaction : रणबीर कपूर सध्या त्याच्या ‘रामायण’मधील भूमिकेमुळे चर्चेत आहे. या बहुप्रतिक्षित चित्रपटाची झलक आता समोर आली आहे. यामध्ये रणबीर कपूर प्रभू श्रीरामांच्या भूमिकेत पाहायला मिळतोय. अभिनेता श्रीरामांच्या भूमिकेतून लक्ष वेधून घेत आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर सर्वत्र त्याची चर्चा सुरू आहे. अशातच आता त्याची बायको अभिनेत्री आलिया भट्टनंही त्याचं कौतुक केलं आहे.

नितिश तिवारी दिग्दर्शित आणि नमित मल्होत्रा निर्मित ‘रामायण’ चित्रपटाचा टीझर हनुमान जयंतीचं औचित्य साधून २ एप्रिल रोजी रिलीज होणार असल्याची माहिती निर्मात्यांनी आधीच दिली होती. आता अखेर हा टीझर रिलीज झाला आहे. अशातच आलिया भट्टनं नवरा रणबीर कपूरच्या ‘रामायण’ चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये रणबीर प्रभू श्रीरामांच्या भूमिकेत असून हातात धनुष्यबाण असल्याचं दिसतं. त्यामुळे आता प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढली आहे.

आलिया भट्टनं केलं रणबीर कपूरचं कौतुक

टीझर शेअर करण्यापूर्वी आलिया भट्टनं नवरा रणबीर कपूरचं ‘रामायण’मधील कामासाठी कौतुकही केलं होतं. सोशल मीडिया मार्फत चाहत्यांशी संवाद साधताना रणबीर कपूरनं ‘रामायण’मध्ये खूप चांगलं काम केलं आहे. असं म्हटलं होतं. आलिया भट्ट म्हणालेली, “रामायणचा टीझर उद्या रिलीज होणार आहे. मी माझ्या सोशल मीडिया अकाउंटवरुन तो पोस्ट करणार आहे. त्यामुळे कृपय चित्रपट बघायला जा आणि तुमचा पाठिंबा द्या.”

Award Banner

अभिनेत्रीनं पुढे नवरा रणबीरच्या कामाचं कौतुकही केलं. ती म्हणालेली, “त्यानं खूप उत्तम काम केलं आहे आणि तुम्ही सगळ्यांनी हा चित्रपट पाहावा यासाठी मी खूप उत्सुक आहे. खूपच जगावेगळी गोष्ट आहे ही.” आलियानं रणबीरचं कौतुक केल्यानंतर आणि सोशल मीडियावर त्याच्या ‘रामायण’ चित्रपटाचा टीझर शेअर केल्यानंतर नेटकरी सोशल मीडियावर तिनं तिच्या नवऱ्याला पाठिंबा दिल्यामुळे कौतुक केरत आहेत.

दरम्यान, भारतात ‘रामायण’चा टीझर रिलीज होण्याआधी न्यू यॉर्कमध्ये नुकताच चित्रपाटचा टीझर रिलीज झाला होता. त्यावेळी न्यू यॉर्क स्पेशल IMAX ट्रेलर स्क्रीनींगमध्ये रणबीर कपूरसुद्धा ‘रामायण’मधील त्याच्या भूमिकेबद्दल बोलला होता. अभिनेता म्हणालेला, “मला आठवतंय जेव्हा काही वर्षांपूर्वी नमितनं मला प्रभू रामांच्या भूमिकेसाठी विचारलं होतं. तेव्हा मी नाही म्हटलेलं. मी सांगितलेलं की मी त्यासाठी योग्य व्यक्ती नाहीये. मला असं वाटलेलं की जर मला या भूमिकेला न्याय देता आला नाही तर. पण, ती भीती क्षणार्धात दूर झाली कारण अशी संधी फार मिळत नाही आणि याच संधीची मला गरज होती.”