Karisma Kapoor & Raveena Tandon Rivalry : बॉलीवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत ज्यांचे एकमेकांबरोबर वाद आहेत, तर काहींचे पूर्वी एकमेकांबरोबर वाद होते. परंतु, आता ते वाद मिटले असून ते एकमेकांचे मित्र-मैत्रिणी आहेत. ९० च्या काळात आपल्या अभिनयानं आणि सौंदर्यानं प्रेक्षकांची मन जिंकणाऱ्या दोन अभिनेत्री म्हणजे रविना टंडन आणि करिश्मा कपूर. परंतु, या दोघींचे संबंध फार बरे नसल्याचं स्वतः अभिनेता आमिर खाननं म्हटलं होतं.
रविना टंडन व करिश्मा कपूर दोघीही बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहेत. त्यांनी आतापर्यंत अनेक हिट चित्रपट दिले आहेत. परंतु, या दोघींमध्ये एकेकाळी मतभेद होते. पण, तरीसुद्धा आपापसातले वाद बाजूला ठेवत या दोघींनी १९९४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘अंदाज अपना अपना’ या चित्रपटात एकत्र काम केलेलं. एकमेकींबरोबर बोलत नसल्यामुळे या चित्रपटाचं शूटिंग करणं त्यांच्यासाठी आव्हानात्मक होतं. फक्त रविना आणि करिश्माच नाही तर सलमान खान व आमिर खानसुद्धा त्यावेळी एकमेकांशी बोलत नव्हते. रविना टंडन आमिर खान यांनी या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचा त्यांचा अनुभव मुलाखतीत सांगितलेला, त्यामुळे हे प्रकरण नेमकं काय आहे याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात…
आमिर खान काय म्हणाला?
राजकुमार संतोषी दिग्दर्शित ‘अंदाज अपना अपना’ चित्रपटामध्ये सलमान खान, आमिर खान, करिश्मा कपूर, रविना टंडन हे कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकांमध्ये होते. परेश रावल व शक्ती कपूर हे अभिनेतेसुद्धा यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिकांतून झळकले होते. ‘इंडिया टुडे’ला दिलेल्या मुलाखतीत आमिर खान रविना व करिश्मा यांच्यामधील वादाबद्दल म्हणालेला, “आम्ही एकत्र चांगला वेळ घालवला, पण तो वेळ आमच्यासाठी आव्हानात्मकसुद्धा होता. चित्रपटाच्या सेटवर वेळेवर येणारा मी एकमेव कलाकार होतो. इतर कोणीच वेळेवर यायचं नाही. तेव्हा रविना आणि करिश्मा यांच्यामध्ये वाद होते, त्यामुळे करिश्मा यायची तेव्हा रविना जायची आणि रविना यायची तेव्हा करिश्मा जायची. आम्ही एकमेकांबरोबर शूट करू शकत नसलो तरीसुद्धा चित्रपट खूप कठीण आव्हानांना सामोरे जात शेवटी पूर्ण करण्यात आला.”
सलमान-आमिरमध्येही होता अबोला
रविना टंडननंसुद्धा सलमान खान व आमिर खान यांच्यातील समस्यांबद्दल सांगतिलेलं. ‘इंडियन एक्स्प्रेस’च्या वृत्तानुसार रविना म्हणालेली, “शूटिंग करताना आम्हाला मज्जा आली, पण आमच्यापैकी कोणीही एकमेकांशी बोलत नव्हतं. प्रत्येकाचे त्यांचे त्यांचे वाद सुरू होते. आमिर आणि सलमान एकमेकांशी बोलत नव्हते, करिश्मा आणि मी बोलत नव्हतो आणि सलमान खान व राजकुमार संतोषी हे दोघेही बोलत नव्हते. मला अजूनही कळत नाही की तो चित्रपट कसा बनवण्यात आला. पण, यामधून एक कळतं की आम्ही सर्वजण उत्तम कलाकार आहोत.”
रविनानं पुढं सलमान व अमिर यांनी तिच्या आणि करिश्मामधील वाद मिटवण्याचा कसा प्रयत्न केला याबद्दलही सांगितलेलं. अभिनेत्री म्हणालेली, “पोरांनी माझ्या व करिश्मामधील भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला. चित्रपटाच्या क्लायमॅक्समध्ये एक सीन होता, जिथे आम्हाला एका भिंतीला बांधण्यात आलेलं असतं. तेव्हा राजजी म्हणालेले, आम्ही तुम्हाला तोवर सोडणार नाही जोवर तुम्ही एकमेकींशी बोलत नाही. तेव्हा मला खूप मजा आलेली. आम्ही खूप हसलो. संवादसुद्धा इतके मजेशीर होते की शूटिंगदरम्यान आम्ही खूप हसलो आणि भांडलोसुद्धा.”
सलमान, आमिर, करिश्मा व रविना यांच्या ‘अंदाज अपना अपना’ चित्रपटाला त्यावेळी जरी बॉक्स ऑफिसवर अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसला, तरीसुद्धा या चित्रपटाची क्रेझ आजही प्रेक्षकांमध्ये कायम आहे. यातील शक्ती कपूर यांचं क्राईम मास्टर गोगो हे पात्र तर अजूनही तितकंच लोकप्रिय आहे. चित्रपटातील या चार कलाकारांची केमिस्ट्री, संवाद या गोष्टी प्रेक्षकांना अजूनही आवडतात.
