Anil Kapoor Nayak Movie Sequel : २०२६ या वर्षात अनेक गाजलेल्या बॉलीवूड सिनेमांचे सीक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. ‘हेरा फेरी ३’बद्दल गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू आहे. त्यातच काही दिवसांपूर्वी ‘3 इडियट्स’ सिनेमाचा सीक्वेल येणार असल्याचं वृत्तसुद्धा समोर आलं. अशातच आता यात आणखी एका सिनेमाची भर पडणार आहे. या वर्षात अनिल कपूर यांच्या एका गाजलेल्या सिनेमाचा सीक्वेल येणार आहे.

अनिल कपूर सिनेमात एका दिवसासाठी मुख्यमंत्री बनले होते तो ‘नायक’ सिनेमा आठवतोय का? नव्वदच्या दशकात जन्मलेल्या अनेक मंडळींनी त्यांच्या लहानपणी अनिल कपूर यांचा हा सिनेमा टीव्हीवर असंख्यवेळा पाहिला असेलच. याच सिनेमाचा सीक्वेल आता प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

अनिल कपूर यांचा २००१ साली प्रदर्शित झालेला ‘नायक’ सिनेमा आता जवळपास २५ वर्षांनंतर पुन्हा एकदा येणार आहे, अशी चर्चा आहे. काही अहवालांनुसार, अनिल कपूर यांनी या चित्रपटाचे हक्क विकत घेतले असून त्याचा सीक्वेल (नायक २) करण्याची त्यांची इच्छा आहे. वर्षानुवर्षे या चित्रपटाची लोकप्रियता वाढत असल्यानं हा सिनेमा पुन्हा मोठ्या पडद्यावर यावा अशी त्यांची इच्छा आहे.

Award Banner

बॉलीवूड हंगामाने दिलेल्या माहितीनुसार, “‘सनम तेरी कसम’चे निर्माते दीपक मुकुट यांच्याकडे ‘नायक’चे हक्क होते. ते हक्क अनिल कपूर यांनी त्यांच्याकडून विकत घेतले आहेत. हा चित्रपट त्यांच्या खूप जवळचा असल्याने या चित्रपटाचा दुसरा भाग बनवण्याची त्यांची इच्छा आहे.” अर्थात, ‘नायक २’बाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.

ए. एस. रत्नम यांनी निर्मिती केलेल्या ‘नायक’ चित्रपटात एका निर्भय पत्रकाराची कथा दाखवण्यात आली होती, जो एका दिवसासाठी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनतो आणि त्या मर्यादित वेळेत अनेक धाडसी निर्णय घेतो. प्रदर्शित होताना चित्रपटाला संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या होत्या. पण हळूहळू तो प्रेक्षकांच्या मनात घर करून गेला आणि पुढे जाऊन त्याला कल्ट चित्रपटाचा दर्जा मिळाला.

सामान्य माणूस भ्रष्टाचार आणि व्यवस्थेविरोधात उभा राहतो, ही ‘नायक’ चित्रपटाची मुख्य संकल्पना आजही तितकीच महत्त्वाची आहे. हाच मुद्दा अनिल कपूर यांना पुन्हा या कथेकडे वळवतो, असे सांगितले जाते. त्यामुळेच ‘नायक २’ आजच्या राजकीय वास्तवावर आधारित असण्याची शक्यता आहे.

‘नायक’ चित्रपटात अनिल कपूर यांच्यासह राणी मुखर्जी मुख्य भूमिकेत होती. तसंच अमरीश पुरी, परेश रावल, सौरभ शुक्ला, जॉनी लीव्हर, शिवाजी साटम आणि नीना कुलकर्णी यांनीही लक्षवेधी भूमिका साकारल्या होत्या. तर अभिनेत्री सुष्मिता सेनही या सिनेमातील एका खास गाण्यात झळकली होती.