बॉलीवूड अभिनेता अनिल कपूर यांना दोन मुली व एक मुलगा अशी तीन अपत्ये आहेत. त्यांची थोरली मुलगी अभिनेत्री सोनम कपूर आहे. तर धाकटीचं नाव रिया कपूर आहे. रिया कपूरचा आज ५ मार्च रोजी ३९ वा वाढदिवस आहे. रिया बहीण व वडिलांप्रमाणे रुपेरी पडद्यापासून दूर आहे. पण ती फॅशन विश्वात सक्रिय आहे. ती चित्रपट निर्माती आणि फॅशन स्टायलिस्ट म्हणून ओळखली जाते.

रिया कपूरने मुंबईतील धीरूभाई अंबानी शाळेत शिक्षण घेतले. त्यानंतर तिने न्यू यॉर्क विद्यापीठातून ड्रामॅटिक लिटरेचरमध्ये पदवी पूर्ण केली. त्यानंतर, रियाने फिल्म इंडस्ट्रीत करिअर करण्याचा निर्णय घेतला. पण बहीण व वडिलांप्रमाणे अभिनय करण्याऐवजी तिने निर्माती म्हणून तिच्या करिअरला सुरुवात केली.

रिया कपूरने निर्मिती केलेले चित्रपट

रियाने २०१० मध्ये ‘आयशा’ या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली. त्यानंतर तिने ‘खूबसूरत’, ‘वीरे दी वेडिंग’, ‘थँक यू फॉर कमिंग’ आणि ‘क्रू’ (Crew) यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांची निर्मिती केली आहे.

रिया कपूर व सोनम कपूरचा फॅशन ब्रँड

तिने तिची बहीण सोनम कपूरबरोबर ‘Rheson’ हा स्वतःचा फॅशन ब्रँड सुरू केला आहे. याशिवाय ती सोनम कपूरची मुख्य स्टायलिस्ट असून सोनमच्या ‘फॅशन आयकॉन’ इमेजमध्ये रियाचा मोठा वाटा आहे. सोनमची पर्सनल स्टायलिस्ट रिया आहे. अनेक मोठ्या इव्हेंटसाठी सोनम कपूरचा लूक रिया डिझाईन करते. ‘A&R’ (Anamika & Rhea) हादेखील रिया कपूरचा ब्रँड आहे.

रिया कपूरची संपत्ती

रिया कपूरची कमाई प्रामुख्याने चित्रपट निर्मिती, स्वतःचा फॅशन ब्रँड (Rheson) आणि विविध ब्रँड्सच्या जाहिरातींतून होते. रिपोर्ट्सनुसार, तिची एकूण संपत्ती सुमारे ४२ ते ५० कोटी रुपये इतकी आहे.

रिया कपूरचा पती कोण आहे?

रिया कपूरने करण बुलानीशी लग्न केलं आहे. जवळपास १२ वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर, १४ ऑगस्ट २०२१ रोजी त्यांनी अनिल कपूर यांच्या जुहू येथील घरी अगदी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत लग्न केले. करण हा एक चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माता आहे. त्याने ‘Selection Day’ सारख्या वेब सीरिजचं दिग्दर्शन केलं आहे. तसेच अनेक जाहिरातीही केल्या आहेत.