Anil Kapoor Mr India Outfit from Mumbai chor bazaar : अनिल कपूर यांच्या कारकिर्दीतील गाजलेल्या चित्रपटांपैकी एक म्हणजे ‘मिस्टर इंडिया’. १९८७ मध्ये प्रदर्शित झालेल्या या सिनेमामुळे अनिल यांची एक सुपरहीरो म्हणून ओळख निर्माण झाली होती. आता अनिल कपूर यांनी पुन्हा एकदा ‘मिस्टर इंडिया’च्या आठवणींना उजाळा दिला आहे. अनिल कपूर यांनी ३९ वर्षांपूर्वीचा ‘मिस्टर इंडिया’चा तोच पोशाख परिधान केला असून, विशेष म्हणजे तो मुंबईच्या चोर बाजारातून खरेदी केल्याचा खुलासा केला आहे.
अनिल कपूर हे पुन्हा एकदा त्यांच्या गाजलेल्या ‘मिस्टर इंडिया’ चित्रपटातील त्याच जुन्या लूकमध्ये दिसणार आहेत. या चित्रपटात त्यांनी घातलेला कोट, शर्ट आणि पँट त्यांनीही अजूनही जपून ठेवली आहे. विशेष म्हणजे, तब्बल ३९ वर्षांनंतरही त्यांना हा पोषाख पूर्णपणे फिट बसत असल्याचे दिसून आले. त्याबद्दल अनिल कपूर म्हणाले, “माझा शर्ट अजूनही मला व्यवस्थित बसतो, पँटही बसते आणि जॅकेटसुद्धा अगदी फिट आहे. ३९ वर्षांनंतरही माझे सगळे कपडे मला व्यवस्थित बसतात. ‘इंडियाज टॉप 1%’ शोची टीम म्हणाली, ‘मिस्टर इंडिया’मधील पोशाख मिळाला असता, तर किती छान झालं असतं,’ यावर मी त्यांना सांगितलं की, मी तो जपून ठेवला आहे.”
काय म्हणाले अनिल कपूर?
‘मिस्टर इंडिया’च्या विशेष एपिसोडबद्दल अनिल कपूर म्हणाले, “आम्ही करत असलेला हा एपिसोड समाजाच्या दृष्टीनंही खूप महत्त्वाचा आहे. हा एपिसोड देशाची सेवा करणाऱ्या लोकांना समर्पित आहे, असाच आमचा विचार होता. चित्रपट पाहिल्यानंतर राज कपूरसाहेबांनीही हाच मुद्दा मांडला होता. या चित्रपटातून आपल्याला काय शिकायला मिळतं? तर प्रत्येक जण ‘मिस्टर इंडिया’ बनू शकतो. जे लोक कोणत्याही अपेक्षेशिवाय देशासाठी काम करतात. ते आपलं नैतिक कर्तव्य समजून हे काम करतात. देश घडवण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे.”

‘मिस्टर इंडिया’मधील जॅकेटबद्दलचा एक खास किस्साही अनिल कपूर यांनी सांगितला. ते म्हणाले, “मी हे जॅकेट चोर बाजारातून विकत घेतलं होतं. योगायोगानं मी माझे केसही वाढवले आहेत. ‘मिस्टर इंडिया’मध्ये जसे लांब केस होते, तसेच आता आहेत. त्यामुळे आज माझे केसही या लूकला अगदी योग्य दिसत आहेत.”


दरम्यान, अनिल कपूर यांचा ‘इंडिया के टॉप १% : द अनिल कपूर शो’ हा कार्यक्रम स्टार प्लस आणि जिओहॉटस्टारवर प्रसारित होतो. शेखर कपूर दिग्दर्शित ‘मिस्टर इंडिया’ या सिनेमाने ८० च्या दशकात प्रचंड लोकप्रियता मिळवली होती. विज्ञान-काल्पनिक सुपरहीरो चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले होते. त्यामध्ये अनिल कपूर यांनी अरुण वर्मा, तर श्रीदेवी यांनी सीमा सोहनी या भूमिका साकारल्या होत्या.
