Anil Kapoor Receives Royalty For This Movie : अनिल कपूर बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहेत. त्यांनी ९०च्या काळात विविध चित्रपटांत काम करीत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. अनिल कपूर त्यांच्या हटके स्टाईलसाठी ओळखले जातात. अभिनेते अनेकदा कुठल्या ना कुठल्या कारणामुळे चर्चेत असतात.
अलीकडेच अनिल कपूर यांचा ‘सुबेदार’ हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाला. तर सध्या ते कामाच्या व्यापामुळे ‘धुरंधर’ चित्रपट करण्यास नकार दिला, असं सांगितल्यामुळे चर्चेत आहेत. पण, तुम्हाला माहीत आहे का अनिल कपूर यांना त्यांच्या १८ वर्षांपूर्वीच्या एका चित्रपटासाठी आजही पैसे मिळतायत. अनिल कपूर यांचा हा चित्रपट नेमका कोणता आहे आणि त्यांना त्यासाठी किती पैसे मिळतात याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात…
अनेक वर्षांनंतरही ‘या’ चित्रपटातील कामासाठी मिळतात पैसे
‘इंडिया टुडे’च्या एका कार्यक्रमामध्ये अनिल कपूर यांनी सांगितलं की, २००८ मध्ये ऑस्कर जिंकणाऱ्या ‘स्लमडॉग मिलेनियर’ चित्रपटातील भूमिकेसाठी आजही त्यांना (रॉयल्टी) पैसे मिळतात. त्यांनी सांगितलं की, नुकतच त्यांना या चित्रपटातील कामासाठी तीन हजार पाउंड मिळाले आहेत. अभिनेते म्हणाले, “मला तुमच्याबरोबर एक गोष्ट शेअर करायची आहे. हा माझ्यासाठी खूप भावनिक क्षण आहे. या गोष्टीला दीड दशकाहूनही अधिक काळ झाला आहे आणि कालच मला पुन्हा ‘स्लमडॉग मिलेनियर’साठी पेमेंटचा चेक मिळाला आहे.” किती रक्कम मिळाली याबद्दल सांगताना अनिल कपूर पुढे म्हणाले, “काल मला ३,००० पाउंड (साडेतीन लाख) मिळाले. मी माझे सर्व कर भरतो म्हणून मी हे मोकळेपणाने सांगू शकतो की, आता मला अर्ध मिलियन पाउंड (जवळपास सहा कोटी) मिळणार आहेत. मी एक करोडपती आहे. मी या पैशांसाठी कधीच मागणी केली नव्हती. ते स्वतःच मला पैसे देत आहेत.”
‘स्लमडॉग मिलेनियर’बद्दल अनिल कपूर काय म्हणाले?
अभिनेते पुढे डॅनी बॉयल यांच्या या चित्रपटात काम करण्यामागचं कारण सांगत म्हणाले, “मी तो चित्रपट स्वतःला नवीन गोष्टी शिकवण्यासाठी केला होता. मला शिकायचं होतं आणि म्हणूनच मी आजही टिकून आहे. त्यांनी मला सांगितलेलं की, ते मला पैसे देऊ शकत नाहीत. तेव्हा मी म्हटलेलं की, मी मागितलेसुद्धा नाहीयेत. मी पैसे न घेताच या चित्रपटात काम करेन.”
अनिल कपूरव्यतिरिक्त ‘स्लमडॉग मिलेनियर’ चित्रपटामध्ये दिवंगत अभिनेता इरफान खान, आयुष खेडेकर, महेश मांजरेकर यांसारखे इतर काही भारतीय कलाकार झळकले होते. २००९ मध्ये या चित्रपटाला ऑस्करकडून नऊ नामांकनं मिळाली होती. त्यातील आठ पुरस्कार या चित्रपटानं पटकावले.
