Anil Kapoor : अभिनेता अनिल कपूरने नायक सिनेमात मुख्यमंत्र्याची भूमिका साकारली होती. अनिल कपूरचा हा चित्रपट २००१ मध्ये आला होता. मात्र आजही हा चित्रपट लोकांच्या मनात घर करुन राहिला आहे. ऑन द स्पॉट निर्णय घेणारा चित्रपटातला मुख्यमंत्री अनिल कपूरने साकारला होता. या पात्राचं नाव शिवाजी राव असं होतं. या चित्रपटासाठी अनिल कपूरने बरीच तयारी केली होती. शिवाय मला राजकारणात जाण्याबाबत विचारणा झाली होती असं अनिल कपूरने सांगितलं आहे.

अनिल कपूरने काय म्हटलं आहे?

मी कायमच नव्या गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करतो. मी विचार करतो अनेकांकडून शिकण्यासारखं खूप काही आहे. नायक चित्रपटासाठी आम्ही बराच सराव केला होता अशी आठवण अनिल कपूरने इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत सांगितली. अनिल कपूर यांची नायकमधली भूमिका लोकांना खूप आवडली होती. तसंच हा चित्रपट एक कल्ट आहे असंही म्हटलं जातं. राज कपूर, नाना पाटेकर, परेश रावल हे सगळे गंभीर प्रकृतीचे अभिनेते आहेत. पण त्यांनी विनोदही तेवढ्याच सशक्तपणे केला आहे. मला नाना पाटेकर, परेश रावल, अनुपम खेर, सतीश कौशिक यांच्याकडून खूप काही शिकता आलं असंही अनिल कपूरने म्हटलं आहे.

राजकारणात जाण्याची संधी चालून आली होती पण…

राजकारणात जाण्याबाबत काही ऑफर आली होती का? या प्रश्नावर अनिल कपूरने सांगितलं की, त्यावेळी चर्चा झाली होती. ऑफर आली होती. पण त्या गोष्टींवर मला चर्चा करण्यात काही अर्थ वाटत नाही. राजकारणात जाण्याची संधी आली होती. पण मला राजकारणात काही रस नाही. कारण जे काम करायचं त्यासाठी ते १०० टक्के पूर्ण करावं लागतं पण मला राजकारण जमणार नाही. मला फोटो काढले जातील, ते छापून येतील त्यानंतर चार दिवसांनी चर्चा होईल यासाठी मला राजकारणात जायचं नाही. मी त्यांना सांगितलं की माझ्यापेक्षा चांगले लोक आहेत, त्यांना संधी द्या असं मी ऑफर देणाऱ्यांना कळवलं असंही अनिल कपूर यांनी म्हटलं आहे.

मी एके व्हर्सेस एके मधल्या अनिल कपूरसारखा नाही

एखादा असा चित्रपट आहे का? ज्यातलं तुम्हाला तुमचं पात्र तुमच्या जवळ जाणारं वाटलं असं विचारला असता अनिल कपूरने सांगितलं की माझ्या जवळपास सगळ्या चित्रपटांमध्ये थोडी थोडी माझी झलक आहे. पण एक आवर्जून सांगेन की AK Vs AK या चित्रपटात मला अनिल कपूरचंच काम अनुराग कश्यपने दिलं आहे. पण तो अनिल कपूर आणि इथे तुमच्यासमोर बसलेला अनिल कपूर वेगळे आहेत. मी त्या चित्रपटातल्या पात्राप्रमाणे नाही. एके मधला अनिल कपूर हा लोकांच्या मनात जसा आहे तसा दाखवण्याचा प्रयत्न केला आहे प्रत्यक्षात मी असा वागत नाही. मी वेगळा आहे असंही अनिल कपूरने सांगितलं.